नवी दिल्ली वृत्तसंस्था
‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. भाजपसाठी कोणत्याही राजकीय पदापेक्षा देश, देशवासीय, तरुण आणि विद्यार्थी हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
भाजपा के कार्यकर्ताओं के लिए पद से कहीं अधिक महत्वपूर्ण देश, हमारी युवा पीढ़ी और विद्यार्थी हैं। आज केंद्रीय शिक्षा मंत्री श्री @dpradhanbjp जी का अपने पद से इस्तीफा इसी को दर्शाता है।
मोदी सरकार देश के युवाओं की भावनाओं का सम्मान करती है और पेपर लीक के विरुद्ध आवश्यक सुधारों के… https://t.co/p12wLKGUkm
— Amit Shah (@AmitShah) July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा याच नैतिक भूमिकेचे उदाहरण असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा ‘एक्स’वरून प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.
‘‘मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा सदैव आदर करते. नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या संदर्भात आवश्यक त्या कठोर सुधारणा करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. भाजपसाठी कोणत्याही पदापेक्षा देश, देशातील तरुण आणि विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत,’’ असे शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
पेपरफुटीच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या सुधारणा आणि कठोर उपाययोजनांमुळे नीट परीक्षेत प्रामाणिकपणे यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळातील कामगिरीचेही अमित शाह यांनी कौतुक केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 ची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना प्रादेशिक तसेच मातृभाषेत परीक्षा देण्यासाठी व्यापक व्यवस्था, पीएम-श्री शाळांचा विस्तार आणि डिजिटल शिक्षणाला चालना देण्याच्या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला.
तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय वाढवून कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात प्रधान यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे शाह यांनी म्हटले. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पाप्रती धर्मेंद्र प्रधान यांचे समर्पण त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात दिसून आले, असेही त्यांनी नमूद केले.
‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांच्या राजीनाम्याने केंद्र सरकारवर वाढत असलेल्या दबावाची तीव्रता अधोरेखित झाली आहे. आता परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल केले जातात आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकार कोणती कठोर पावले उचलते, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले आहे.


