नवी दिल्ली वृत्तसंस्था
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळू लागला आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जमुळे वातावरण तापले असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
विद्यार्थ्यांना धीर देताना जरांगे पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “मी अंतरवाली सराटीत आंदोलन करत होतो, तेव्हाही याच सरकारने आमच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे तुमची वेदना आम्ही समजू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची जागा सोडू नका. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हीही तुमच्यासोबत आहोत,” असे ते म्हणाले.
यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. “विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागला, तर भाजपच्या नेत्यांना देशभरात फिरू देणार नाही. ज्या आई-वडिलांनी मतदान करून हे सरकार निवडून दिले, त्यांच्याच लेकरांवर आज लाठीचार्ज होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी टीका त्यांनी केली.
नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. “गोरगरिबांची लेकरं न्याय मागण्यासाठी देशाच्या राजधानीत आली आहेत. त्यांच्या आंदोलनावर लाठ्या चालवणे योग्य नाही. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे कारवाई होणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. “शांततेच्या आंदोलनातच खरी ताकद असते. संताप असला तरी संयम सोडू नका. शांततापूर्ण लढ्यामुळेच न्याय मिळतो,” असे सांगत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांच्या जंतर-मंतर भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणखी राजकीय पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधातील विरोधकांची आक्रमकता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.


