मुंबई प्रतिनिधी
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवत राज्य सरकारने रुग्णांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गंभीर आजारांवरील उपचार अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या योजनेत आता प्राथमिक स्तरावर पीईटी स्कॅनचा समावेश करण्यात येणार असून, कर्करोगावरील उपचारांसाठी आर्थिक मदतीतही वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री अबिटकर म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजना अधिक व्यापक आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी सरकार विविध सुधारणा राबवत आहे. आधुनिक निदान सुविधा आणि दर्जेदार उपचारांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
योजनेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी योजनेशी संलग्न रुग्णालयांच्या पात्रता निकषांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी जोडण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अधिकाधिक रुग्णालयांमध्ये मोफत व दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्करोगासह गंभीर आजारांवरील उपचार अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आरोग्य क्षेत्रातील हा निर्णय लाखो रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


