मुंबई प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष रंगला. वसई-विरारमधील पूरस्थितीवर चर्चा सुरू असताना सभागृहात कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. या आक्षेपावर भाजप आमदार अतुल भातखळकर सरकारच्या बचावासाठी उभे राहताच वातावरण तापले आणि काही मिनिटे सभागृहात मोठा गदारोळ झाला.
विरोधकांनी जनतेच्या गंभीर प्रश्नांवर सरकारची उदासीनता असल्याचा आरोप करत मंत्री सभागृहात का नाहीत, असा सवाल उपस्थित केला. त्यावर भातखळकर यांनी विरोधकांनाच लक्ष्य करत टोलेबाजी केली. यामुळे आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव संतप्त झाले आणि दोघांनीही भातखळकरांवर जोरदार शब्दप्रहार केला.
आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरे यांनी, “तुम्ही आम्हाला शिकवू नका. राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला उपदेश करू नये. तुमचं वय झालंय, खाली बसा… वयाचं भान ठेवून बोला,” अशा शब्दांत भातखळकरांना सुनावले. त्यांच्या आक्रमक देहबोलीमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर भास्कर जाधव यांनीही भातखळकरांच्या निष्ठेच्या मुद्द्यावर पलटवार केला. “तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः मनसेत जाण्याच्या तयारीत होता. नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे तुमचा पक्षप्रवेश झाला नाही. मग तुम्ही आम्हाला निष्ठेचे धडे कसे देऊ शकता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जाधव यांनी पुढे भातखळकरांवर वैयक्तिक टीका करत, “राम मंदिरात चोरी करणारे तुम्ही. तुमच्या मर्यादा, तुमची कुवत आणि तुमची झेप महाराष्ट्राला माहिती आहे. फक्त तुम्हालाच सर्वकाही कळते आणि इतरांना काहीच समजत नाही, अशा आविर्भावात तुम्ही कायम वावरता. हा अहंकार लोकांनी ओळखला आहे,” असा घणाघात केला.
या शाब्दिक संघर्षामुळे सभागृहात काही काळ कामकाज ठप्प झाले. अध्यक्षांनी वारंवार हस्तक्षेप करून सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. अखेर वातावरण निवळल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांतील आरोप-प्रत्यारोपांनीच पुन्हा एकदा सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. मंत्री अनुपस्थितीचा मुद्दा, त्यानंतर झालेली वैयक्तिक टीका आणि आक्रमक शब्दयुद्ध यामुळे दिवसाच्या कामकाजावर या घटनेचीच छाप राहिली.


