मुंबई प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी थरारक घटना मालाड पूर्व येथे घडली. भर दिवसा, भर रस्त्यात एका तरुणीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गांधी नगर परिसरातील बजरंगबली चाळीत घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन समाजकंटकांनी तरुणीला अडवून तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करत घटनास्थळी धाव घेताच आरोपींनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कुरार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या निर्भीड हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
घटनेनंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत कुरार पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोपींना तातडीने अटक करावी, परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. मालाड पूर्वमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “मुंबईतही महिलाच सुरक्षित नाहीत का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
श्रीरामपूरातही धारदार शस्त्राने युवकावर हल्ला; आठ दिवसांत तिसरी प्राणघातक घटना
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातही प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. वार्ड क्रमांक २ मधील जयभीम चौक परिसरात भंगार व्यवसाय करणारे ३२ वर्षीय समीर सुलतान शाह यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या समीर शाह यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील १७ वर्षीय मुख्य आरोपीने काही तासांतच स्वतःहून पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. मागील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, एकूण सहा आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांत श्रीरामपूरात प्राणघातक हल्ल्यांच्या सलग तीन घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.


