मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासणीत मुख्य बोगद्याला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले असून, सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांसमवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अचानक बदल झाला. परिणामी मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती घसरून प्रवेशद्वाराच्या परिसरात आली.
दरड कोसळल्यामुळे बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या संरक्षणात्मक स्लॅबचा काही भाग आणि संरक्षक भिंतीचा काही हिस्सा कोसळून रस्त्यावर पडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे डोंगराच्या माथ्यावरील परिस्थितीचे अचूक निरीक्षण करणे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पाऊस ओसरल्यानंतर भू-तज्ज्ञ आणि अभियंत्यांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी केली जाणार आहे. पाण्याचा प्रवाह बदलण्यामागील कारणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक कायमस्वरूपी उपाययोजनांबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, रस्त्यावर पडलेला स्लॅब, दगड आणि इतर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त सुरक्षा पाहणी व जोखीम मूल्यांकनानंतरच घेतला जाईल. नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका राहणार नाही, याची खात्री झाल्यानंतरच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी स्पष्ट केले.


