बँकॉक
थायलंडच्या ईशान्य भागात गुरुवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीर्थयात्रेला निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहावर पिकअप ट्रक घुसल्याने नऊ भिक्षूंचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. जखमींपैकी तीन भिक्षूंची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. या प्रकरणात वाहन चालवणारा ११ वर्षांचा अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुकदाहान प्रांतातील ३५ बौद्ध भिक्षू उबोन राचाथानी प्रांताकडे सुमारे २६० किलोमीटरच्या पायी तीर्थयात्रेसाठी निघाले होते. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिक्षू रस्त्याच्या कडेला शिस्तबद्ध रांगेत चालत असताना भरधाव पिकअप ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट त्यांच्या समूहात घुसला.
मुकदाहान प्रांताचे राज्यपाल वोरियन बूनारत यांनी घटनेला दुजोरा देताना सांगितले की, पाच भिक्षूंचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अन्य चार भिक्षूंनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले. अपघातानंतर जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, वाहन चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची चौकशी बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनावरील नियंत्रण कसे सुटले आणि अल्पवयीन मुलगा वाहन कसे चालवत होता, याचा सर्वंकष तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे थायलंडमध्ये शोककळा पसरली असून, धार्मिक यात्रेदरम्यान झालेल्या या अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


