ओस्लो :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेजियन महिला पत्रकार हॅले लिंग हिचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा दावा समोर आल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. पत्रकाराने स्वतःच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत ही माहिती दिली असून, या प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पंतप्रधान मोदी नुकतेच नॉर्वे दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही, अशी चर्चा होती.
याचवेळी परिषद संपल्यानंतर नॉर्वेची पत्रकार हॅले लिंग यांनी मोबाईलवर व्हिडीओ शूट करत पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारला. “तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?” असा सवाल त्यांनी केला. मात्र पंतप्रधानांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते पुढे निघून गेले. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
यानंतर हॅले लिंग यांनी संबंधित व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. दरम्यान, आता त्यांनी ‘X’ वर नवीन पोस्ट करत फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील आपली दोन्ही अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आल्याचा दावा केला आहे.
“जर तुम्ही माझ्याशी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असाल, तर सध्या ते शक्य नाही. कारण माझी दोन्ही अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आली आहेत. मला भारतीय नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, मात्र आता त्याला उशीर होईल. मला आशा आहे की मेटा माझी अकाऊंट्स पुन्हा सुरू करेल,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या घडामोडीनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा प्रकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका केली, तर काहींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नियमांमुळे अकाऊंटवर कारवाई झाली असावी, असे मत व्यक्त केले.
“आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा?”; पत्रकार परिषदेत तीव्र सवाल
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत पत्रकार परिषदेतही हॅले लिंग यांनी कठोर प्रश्न उपस्थित केले होते. भारताचे परराष्ट्र सचिव सिबी जॉर्ज पत्रकारांना दौऱ्याची माहिती देत असताना लिंग यांनी भारतातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला.
“आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा? भारतात जे घडत आहे ते थांबवणार का? पंतप्रधान कधी भारतीय माध्यमांच्या कठीण प्रश्नांची उत्तरं देणार आहेत का?” असे सलग प्रश्न त्यांनी विचारले.
या प्रश्नांनंतर पत्रकार परिषदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर सिबी जॉर्ज यांनी नाराजी व्यक्त करत, “तुम्ही प्रश्न विचारू शकता. मात्र उत्तर कशा प्रकारे द्यायचे हा माझा अधिकार आहे,” असे सुनावल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारतातील माध्यम स्वातंत्र्य, पत्रकार परिषदांची पद्धत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कारवाई यावर चर्चा सुरू झाली आहे.


