वॉशिंग्टन वृत्तसंस्था
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या क्षमतेसोबत त्याच्या गैरवापराचा धोका किती गंभीर असू शकतो, याकडे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी लक्ष वेधले आहे. AI चा गैरवापर झाल्यास अशा घटना घडू शकतात, ज्यात तब्बल एक अब्ज लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा गेट्स यांनी दिला. मात्र, हे निश्चित भाकीत नसून अत्यंत धोकादायक परिस्थितीची शक्यता म्हणून त्यांनी हा मुद्दा मांडला आहे.
NBC Newsच्या ‘Meet the Press’ कार्यक्रमात सूत्रसंचालक क्रिस्टन वेलकर यांनी गेट्स यांना AI इतकी शक्तिशाली होऊ शकते का, की तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी जीवितहानी होईल, असा प्रश्न विचारला. त्यावर गेट्स यांनी AI इतकी सक्षम झाली असल्याचे सांगितले की, तिचा चुकीच्या हेतूने वापर करणाऱ्या व्यक्तींमुळे अब्जावधी लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात, असे स्पष्ट केले.
‘AI नव्हे, तर चुकीच्या हातातील AI अधिक धोकादायक’
गेट्स यांच्या इशाऱ्याचा केंद्रबिंदू AI स्वतःहून मानवजातीचा नाश करेल हा नसून, प्रगत AI साधनांचा गैरवापर करणारे लोक हा आहे. विशेषतः जैविक शस्त्रे तयार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळवणे, सायबर हल्ले किंवा इतर मोठ्या प्रमाणावरील घातक कारवायांमध्ये AI चा गैरवापर होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
‘चांगला आणि वाईट हेतू ओळखणे कठीण’
जीवघेण्या आजारांवरील औषधांच्या संशोधनासाठी AI वापरणारा वैज्ञानिक आणि जैविक दहशतवादासाठी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करणारी व्यक्ती यांच्यातील फरक ओळखणे भविष्यात अधिक कठीण होऊ शकते, अशी चिंता गेट्स यांनी व्यक्त केली. त्यामुळे AI विकासासोबत सुरक्षा उपाय आणि देखरेख यंत्रणा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
AI वर बंदी नव्हे, सुरक्षिततेवर भर
गेट्स यांच्या व्यापक भूमिकेनुसार AI मध्ये आरोग्य, शिक्षण, शेती यांसह अनेक क्षेत्रांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे तंत्रज्ञान थांबवण्याऐवजी त्याचे फायदे कायम ठेवत गैरवापर आणि गंभीर धोके रोखण्यासाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. त्यांच्या मते, केवळ कंपन्यांच्या स्वनियमनावर अवलंबून राहणे पुरेसे नसून सरकारी पातळीवर नियम आणि देखरेख आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ‘एक अब्ज लोकांचा मृत्यू होईल’ अशी भविष्यवाणी गेट्स यांनी केलेली नाही. त्यांनी प्रगत AI चा दुष्ट हेतूने वापर झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणण्याची क्षमता निर्माण होऊ शकते, अशी संभाव्य धोक्याची सूचना केली आहे.


