जळगाव प्रतिनिधी
जळगाव : शेतात उभ्या पिकांची दुरवस्था आणि हातातून गेलेला खरीप हंगाम याचे वास्तव दाखवण्यासाठी मेहुणबारे येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. पुष्पगुच्छ देण्याऐवजी शेतकऱ्यांनी त्यांच्या हातात वाळलेल्या मक्याची पेंढी दिली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात आता हिरवे पीक नसून केवळ वाळलेली पिके उरली आहेत, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील शेतांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांची स्थिती, उत्पादनातील संभाव्य घट आणि आर्थिक अडचणी जाणून घेतल्या. मेहुणबारे येथील शेतकऱ्यांनी “आमच्या हातात आता वाळलेल्या पिकाशिवाय काहीच उरलेले नाही. ही परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचवा,” अशी भावना व्यक्त केली.
चाळीसगावसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ७० ते ८० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी झाडांना अपेक्षित बोंडे आलेली नाहीत. मक्याची पाने वाळून गेली आहेत, तर बाजरीचे पीकही करपले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असताना शेतकऱ्यांसमोर पुढील काळातील आर्थिक प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. कर्जाचा भार, कुटुंबाचा खर्च, जनावरांसाठी चारा आणि पुढील हंगामासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना आहे. प्रत्यक्ष शेतातील नुकसान लक्षात घेऊन शासनाने मदत आणि नुकसानभरपाईबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह १५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत कधी आणि किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी आमदार सुनील भुसारा, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, पंकज बोराडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


