मुंबई प्रतिनिधी
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे आणत मोठी राजकीय घोषणा केली आहे. मुंबईतील मातोश्री येथे शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केली. या आंदोलनाची सुरुवात येत्या रविवारी (५ जुलै) दुपारी ४ वाजता दादर येथील मारुती मंदिरापासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत राम मंदिराच्या नावावर सत्ता मिळवल्यानंतर आता त्याच मंदिराच्या नावाचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप केला. “राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीचा वापर इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात असल्याच्या चर्चा आहेत. हा राम मंदिरावरच दरोडा आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“अटलबिहारी वाजपेयी यांनी एकेकाळी ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’ असे म्हटले होते. आता मी म्हणतो, ‘हिंदू माफ नाही करेल’. या भावनेतून आम्ही ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करणार आहोत,” असे ठाकरे यांनी जाहीर केले.
भाजपच्या सत्तेचे मूळ राम मंदिरात
भाजपच्या राजकीय उभारणीचा पाया राम मंदिर आंदोलनात असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. त्या संघर्षाची आठवण आजही जनतेच्या मनात ताजी आहे. त्या आंदोलनाचे राजकीय भांडवल करून भाजप आज देशात अमर्याद सत्ता उपभोगत आहे.”
ते पुढे म्हणाले, “एकेकाळी गांधीवादी समाजवादाची भूमिका घेणाऱ्या भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुढे केला आणि त्यातून देशभर जनाधार मिळवला. मात्र आता त्याच राम मंदिराच्या नावावर वेगळेच राजकारण सुरू आहे.”
“राम मंदिरावर दरोडा”
राम मंदिर ट्रस्टच्या निधीबाबत उपस्थित होत असलेल्या चर्चांचा उल्लेख करत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला. “आज आमदार-खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन’ राबवले जात आहेत. मग हे ‘ऑपरेशन राम मंदिर’ आहे का? राम मंदिरासाठी जमा झालेल्या पैशांचा वापर इतर पक्ष फोडण्यासाठी होत असल्याची चर्चा आहे. या आरोपांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
हिंदुत्वाच्या भावनांना पुन्हा साद
राम मंदिर आंदोलनाच्या काळातील घटनांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “गोध्रा, अहमदाबाद दंगल, मुंबई बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांमध्ये हिंदू समाजाने मोठ्या वेदना सोसल्या. त्या भावनांचे राजकीय भांडवल भाजपने केले. मात्र आज त्याच हिंदुत्वाचा वापर सत्तेसाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी केला जात आहे.”
देशातील प्रश्नांवरही सरकारवर टीका
देश आणि राज्यातील वाढत्या समस्या, महागाई, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरतेचाही उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “आज नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र सरकारची प्राथमिकता वेगळीच आहे. विरोधकांना संपवणे, पक्ष फोडणे आणि सत्तेचा गैरवापर करणे हेच सुरू आहे. आता या राजकारणाच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे.”
रविवारी दादरमध्ये पहिला टप्पा
‘राम रक्षा आंदोलन’ची सुरुवात रविवारी दुपारी ४ वाजता दादर येथील मारुती मंदिरातून होणार असून, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या आंदोलनातून भाजपच्या राजकारणाला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


