मुंबई प्रतिनिधी
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आपल्या पक्षांतराच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांकडून जाणीवपूर्वक माझी राजकीय बदनामी केली जात असून, मी शिवसेनेसोबतच ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडे झालेल्या एका पक्षप्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये सुनील शिंदे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
‘पायाखालची वाळू सरकलेल्यांकडून अफवा पसरवल्या जात आहेत’
शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “काही लोकांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने माझी राजकीय बदनामी करण्याचा आणि शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. माझ्याबाबत जाणीवपूर्वक खोट्या आणि बिनबुडाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या सर्वामागील सूत्रधार कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांना चांगलेच ठाऊक आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी कालही शिवसेनेसोबत होतो, आजही शिवसेनेसोबतच ठाम उभा आहे आणि उद्याही राहणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी माझी निष्ठा कायम आहे. निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मुंबईकर आणि वरळीकरांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत राहणार आहे.”
राजकीय चर्चांना उधाण
विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ठाकरे गटातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर सुनील शिंदे हेही शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात कुजबूज रंगली.
नीलम गोऱ्हेंचे खुले निमंत्रण
दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील शिंदे यांना पक्षात येण्याचे खुले निमंत्रण दिले. “कोणी नाराज असेल तर त्यांनी ती नाराजी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडावी. आमच्या पक्षात काम करण्याची मोठी संधी आहे. मात्र कोण पक्षप्रवेश करणार, हे संबंधित व्यक्तीशिवाय कुणालाही माहिती नसते,” असे त्या म्हणाल्या.
सुनील शिंदे यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळाला असला, तरी मुंबईतील राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


