मुंबई प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित अंमलबजावणीविरोधात सोमवारी मुंबईत निळ्या झेंड्यांचे वादळ धडकले. भर पावसाची तमा न बाळगता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंबेडकर अनुयायी मुंबईत दाखल झाले आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढत आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन केले. आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या आंदोलनाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतल्याचे सांगत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
सकाळपासूनच विविध जिल्ह्यांमधून आलेले आंदोलक मुंबईत जमा होऊ लागले होते. हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि उपवर्गीकरणाविरोधातील फलक घेऊन हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. “उपवर्गीकरण रद्द करा”, “संविधान वाचवा”, “सामाजिक न्याय अबाधित ठेवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
आझाद मैदानावरील सभेत बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. “आजच्या विराट आंदोलनाची राज्य सरकारने आणि संपूर्ण विधिमंडळाने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून उद्या किंवा परवा बैठक होण्याची शक्यता आहे. ही आपल्या लढ्याची अर्धी लढाई जिंकली आहे; मात्र उपवर्गीकरण पूर्णपणे थांबविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सरकारकडून आश्वासन मिळत असले तरी केवळ बैठकीवर समाधान मानून चालणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी जिल्हानिहाय आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. “राज्यातील ५८ ते ५९ अनुसूचित जाती आता शांत बसणार नाहीत. हा संघर्ष केवळ मुंबईपुरता मर्यादित राहू नये. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात हा आवाज पोहोचला पाहिजे. समाज एकसंघ राहिला तरच हा लढा यशस्वी होईल,” असे ते म्हणाले.
उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडेल आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का बसेल, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. सरकार समाजात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अनेकांनी केला. सामाजिक न्यायाच्या नावाखाली अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडली.
मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनांसह अनेक लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला. आमदार ज्योती गायकवाड आणि संजय मेश्राम यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिल्यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध स्तरांवर विरोध सुरू असून मुंबईतील हा मोर्चा आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आंदोलनांपैकी एक मानला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आझाद मैदान आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाच्या शेवटी आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आवाहन करत, “हा संघर्ष केवळ उपवर्गीकरणाविरोधात नाही, तर सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि समानतेच्या संरक्षणासाठी आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल,” असा इशारा दिला.
मुंबईतील या विराट शक्तिप्रदर्शनानंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, सरकार आगामी बैठकीत कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


