मुंबई प्रतिनिधी
मुंबई : चेंबूर परिसरात मंगळवारी दुपारी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना चेंबूरमधील ११ नंबर रोड येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, टिळक नगर येथील युनिव्हर्सल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना अचानक रस्त्यालगतचे मोठे झाड बसवर कोसळले. झाडाचा मोठा भाग बसच्या छतावर पडल्याने बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका विद्यार्थ्याला बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काही काळ युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. झाड हटवून बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, तसेच झाड कोसळण्यामागील कारणांचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.


