पुणे प्रतिनिधी
राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला आता शिंग्रोबा धनगरांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उद्योग क्षेत्रातून पुढे आलेल्या या प्रस्तावामुळे प्रकल्पाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत आला असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सुमारे १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मेपासासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या आधुनिक मार्गामुळे घाट विभागातील धोकादायक वळणे टाळली जात असून, मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी तब्बल ३० मिनिटांनी कमी झाला आहे. सुरक्षित, वेगवान आणि अखंड वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प राज्यासाठी मैलाचा दगड मानला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रकल्पाला शिंग्रोबा धनगरांचे नाव देण्याची मागणी केली आहे. हा केवळ नामकरणाचा प्रस्ताव नसून, इतिहास आणि लोकश्रद्धेला सन्मान देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
शिंग्रोबा धनगरांची लोककथा
पत्रात बटवाल यांनी शिंग्रोबा धनगरांबाबत प्रचलित असलेल्या लोकपरंपरेचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, १९व्या शतकात शिंग्रोबा धनगर यांनी इंग्रजांना खंडाळा घाटातील सोपा आणि सुरक्षित मार्ग दाखवला होता. त्याबदल्यात बक्षीस देण्याची तयारी इंग्रजांनी दर्शविली असता, “मला काही नको, पण तुम्ही आमचा देश सोडा,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या इंग्रजांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे लोककथेत म्हटले जाते.
त्यानंतर घाट परिसरात वारंवार अपघात होऊ लागल्याने स्थानिकांनी शिंग्रोबांच्या स्मरणार्थ मंदिर उभारले. आजही अनेक वाहनचालक सुरक्षित प्रवासाच्या श्रद्धेपोटी शिंग्रोबाच्या मंदिरात दर्शन घेऊन नाणे अर्पण करतात. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्या बोगद्याला किंवा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला शिंग्रोबा धनगरांचे नाव देणे उचित ठरेल, असा आग्रह पत्रातून धरण्यात आला आहे.
उद्योग क्षेत्रालाही मोठा लाभ
दरम्यान, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळत असल्याचे उद्योग क्षेत्राचे मत आहे. मुंबई, पुणे आणि चाकणसारख्या औद्योगिक पट्ट्यांमधील दळणवळण अधिक वेगवान झाल्याने मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होत आहे. पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनत असून, उद्योगांतील उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे. तसेच कामगारांची ये-जा सुलभ झाल्याने उद्योगांना प्रत्यक्ष फायदा होत असल्याचेही उद्योग क्षेत्राचे म्हणणे आहे.
सरकारची भूमिका महत्त्वाची
‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा मानला जातो, तितकाच त्याच्या नामकरणाचा प्रश्नही आता चर्चेचा विषय ठरत आहे. शिंग्रोबा धनगरांच्या स्मृतीला या प्रकल्पाद्वारे अभिवादन करण्याच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.


