नवी दिल्ली वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी किंवा सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार अथवा फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून काही विद्यमान मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासह सुमारे दहा ते बारा मंत्र्यांमध्ये बदल होऊ शकतो. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सध्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत असलेले शक्तिकांत दास यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता चर्चेत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र, या भेटीचा मंत्रिमंडळ विस्ताराशी अधिकृत संबंध असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
अनेक नव्या चेहऱ्यांना संधी?
संभाव्य फेरबदलात माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मेरठचे खासदार अरुण गोविल, खजुराहोचे खासदार विष्णू दत्त शर्मा, बिहारमधील महाराजगंजचे खासदार जनार्दन सिंग सिग्रीवाल यांची नावे चर्चेत आहेत. बिहारमधील राजकीय समीकरणांचा विचार करून जनता दल (युनायटेड)ला अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, एनडीएला पाठिंबा देणाऱ्या काही सहयोगी पक्षांतील खासदारांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंजाबच्या राजकारणावर लक्ष
पंजाब विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील राजकीय समीकरणांनुसार काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर राघव चड्डा, अशोक मित्तल तसेच राज्यसभा सदस्य तरुण चुग यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जॉर्ज कुरियन आणि बिट्टू यांना पुन्हा संधी नाही?
केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांना पुन्हा राज्यसभेवर संधी न मिळाल्याने त्यांचे मंत्रिपद कायम राहण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संभाव्य फेरबदलात त्यांना वगळले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रातूनही बदलाची शक्यता
महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या प्रतिनिधित्वातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य विभाग काढून घेऊन त्यांच्याकडे केवळ आयुष मंत्रालयाची जबाबदारी ठेवली जाऊ शकते. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळू शकते, अशीही चर्चा आहे.
अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये बदल?
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे, अर्थ, ऊर्जा, शिक्षण, वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, रसायन व खते, सहकार, मत्स्यव्यवसाय, जलशक्ती, कृषी, पर्यावरण आणि कायदा या महत्त्वाच्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडील ऊर्जा मंत्रालय दुसऱ्या मंत्र्याकडे सोपविले जाऊ शकते, तर शहरी विकास मंत्रालय त्यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शक्तिकांत दास यांच्याकडे अर्थमंत्रिपद?
राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे शक्तिकांत दास. अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात येऊन अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
शिक्षण खात्यात बदल?
गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण मंत्रालय विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. विशेषतः नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण मंत्रालयावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडील शिक्षण खाते बदलून विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.


