मुंबई प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेत पुन्हा एकदा गंभीर गुन्ह्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट- नालासोपारा फास्ट लोकलमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या हत्येत झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मृत तरुणाचे नाव मयंक लोहार (२२) असे असून तो प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करीत होता. प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे लोकलच्या दरवाजाबाबत झालेल्या वादातून हा प्रकार घडला. अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान मयंक आणि अन्य एका प्रवाशामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
याच दरम्यान आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढून मयंकच्या पोटावर वार केल्याचे तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी झालेला मयंक डब्यातच कोसळला. घटनेनंतर डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रात्री ११.०४ वाजता लोकल बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर जखमी तरुणाला वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी रात्री ११.२२ वाजता त्याला मृत घोषित केले. दरम्यान, लोकल पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपीने बोरिवली स्थानकात उतरून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोरिवली सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) या प्रकरणाचा तपास करीत असून स्थानकांवरील तसेच रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून विविध पथके त्याचा शोध घेत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत
उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दी, किरकोळ वाद आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे लोकलमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता प्रवासी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
याआधी जानेवारी महिन्यात मालाड रेल्वे स्थानकावर एका महाविद्यालयीन प्राध्यापकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतरही रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता पुन्हा एका तरुणाचा जीव गेल्याने उपनगरी रेल्वेतील सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर बनला आहे.


