मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे दावे करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरातील दायमा रोडवरील ‘ओम साई’ इमारतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिण्याच्या पाण्यात चक्क जिवंत किडे आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत होती. अनेक रहिवाशांनी पाण्याला गटारासारखा वास येत असल्याची तक्रार केली होती. सुरुवातीला ही समस्या तात्पुरती असावी, असे समजून नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र मंगळवारी सकाळी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात जिवंत किडे तरंगताना दिसल्याने संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली.
एका-दोन नव्हे, अनेक घरांमध्ये समान समस्या
विशेष म्हणजे हा प्रकार केवळ एका घरापुरता मर्यादित नसून इमारतीतील अनेक घरांमध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. संतप्त रहिवाशांनी या पाण्याचे नमुने बाटल्यांमध्ये भरून ठेवले असून संबंधित अधिकाऱ्यांना ते दाखविण्याची तयारी केली आहे.
“नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच, पण ते वापरण्यालाही भीती वाटत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.
नागरिकांना उकळूनच पाणी पिण्याचे आवाहन
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन इमारतीच्या व्यवस्थापनाने सर्व रहिवाशांना खबरदारीचा इशारा दिला आहे. प्रश्न निकाली निघेपर्यंत पाणी उकळून, गाळून आणि शक्य असल्यास फिल्टर करूनच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, टायफॉइड, कावीळ यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जलवाहिन्या गटाराच्या संपर्कात?
स्थानिकांच्या मते, खेरवाडी परिसरातील अनेक जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईन आणि गटार वाहिन्या एकमेकांच्या अत्यंत जवळ असल्याने गळती झाल्यास दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.
तातडीने कारवाईची मागणी
या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जलवाहिन्यांची तपासणी करण्यात यावी, दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि ओम साई इमारतीसह परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


