मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. “रात्री खासदारांना शिव्या घालायच्या आणि सकाळी त्यांचे कौतुक करायचे, हे चालणार नाही. सेनापती घरात बसून लढत नसतो, तो रणांगणात उतरून नेतृत्व करतो,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “हे आम्हाला चॅलेंज देतात, तुडवण्याच्या भाषा करतात. पण तुडवायला पाय लागतात. हिंमत असेल तर समोर या. तुम्ही समोर आलात तर हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?” असा इशारा देत शिंदेंनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
“हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे”
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “कुणावर संकट आले तर सर्वात आधी मी पुढे उभा राहीन. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे. मी डॉक्टर नसला तरी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही.” त्यांच्या या वक्तव्याची उपस्थित शिवसैनिकांकडून जोरदार दाद मिळाली.
मोदी-शाह यांचे कौतुक, महायुतीच्या एकजुटीवर भर
भाषणादरम्यान शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.
“देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा काही लोक सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही केवळ खुर्चीसाठी एकत्र आलो नाही. काही लोक गुपचूप जाऊन त्यांना सांगतात, पण ते सर्व येऊन आम्हालाच सांगतात,” असे सांगत त्यांनी महायुतीतील एकोपा अधोरेखित केला.
उद्धव ठाकरेंवर वारसदाराच्या मुद्द्यावरून निशाणा
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे यांनी शिवसेनेच्या वारसत्वाचा मुद्दा उपस्थित केला. “रक्ताचे नाते सांगून कोणी वारस होत नाही. सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही. शिवसेना ही जमिनीचा तुकडा नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या काळजाचा तुकडा आहे,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तुम्ही त्यांना त्रास दिला. त्यांच्या निधनानंतर ज्यांचा त्यांना तिरस्कार होता, त्यांचाच पुरस्कार तुम्ही केला. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली आणि दुसऱ्यांदा काँग्रेसने. त्या लोकांना पुढे करून ज्याने शिवसेनेचा भगवा मुक्त केला, त्याच्यावर आज टीका केली जात आहे.”
“पक्ष म्हणजे आमदार-खासदार नव्हे, तर कार्यकर्ता”
पक्ष संघटनेच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना शिंदे म्हणाले, “पक्ष म्हणजे केवळ आमदार, खासदार किंवा मंत्री नव्हे. पक्ष म्हणजे शिवसैनिक. निवडणूक संपल्यानंतरही कार्यकर्ता तितकाच महत्त्वाचा राहिला पाहिजे. कार्यकर्ता वाढला तरच पक्ष वाढतो.”
घराणेशाहीच्या आरोपांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “कोणी आमदार किंवा मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला संधी देणार नाही. पण त्याने कर्तृत्व सिद्ध केले असेल तर त्याकडे दुर्लक्षही करणार नाही.”
सर्वसामान्यांना संधी देण्याचा दावा
“माझ्याकडे वशिला लागत नाही, पैसे लागत नाहीत, मर्सिडीज लागत नाही. माझे लक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे असते. त्यामुळेच आपण भीमाच्या पोरीला, ज्योती वाघमारे यांना राज्यसभेत पाठवले. सर्वसामान्य शिवसैनिकालाही संधी मिळू शकते, हे आम्ही दाखवून दिले,” असा दावा त्यांनी केला.
आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा
भाषणाच्या शेवटी शिंदे भावूक झाले. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “आनंद दिघे माझ्या पाठीशी होते. त्यांच्या जाण्याचे दुःख डोंगराएवढे होते. त्यानंतर बाळासाहेबही गेले. आज माझे कार्यकर्ते आणि नेते हेच माझे कुटुंब आहे.”
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भाषणातून शिंदे यांनी ठाकरे गटावर तीव्र राजकीय हल्ला चढवतानाच आपल्या नेतृत्वाचा आणि महायुतीतील भूमिकेचा ठळकपणे पुनरुच्चार केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या या आक्रमक भूमिकेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


