मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली. सभागृह खचाखच भरल्याने अनेक कार्यकर्त्यांना बाहेरूनच कार्यक्रम ऐकावा लागला. या मेळाव्यात वक्ते नितीन चंदनशिवे यांनी आपल्या खास शैलीतील भाषणातून राज्यातील सत्ताधारी नेते, बंडखोर खासदार आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या उपरोधिक आणि टोलेबाज वक्तव्यांवर सभागृहात वारंवार हास्यकल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे आणि इकडेही राजकीय दंगल सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकजण युद्धाच्या भाषा करतात; पण घरातला गॅस संपला की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा हे समजतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हणाले होते, ‘युद्ध नको, बुद्ध हवा’. ते ऐकून मला वाटलं, यांच्या घरीही बहुतेक गॅस संपला असावा,” असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
‘परत येणाऱ्यांना पक्षात घेऊ नका’
राज्यातील राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना चंदनशिवे म्हणाले की, आगामी काळात सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास अनेकांना वाटत आहे. मात्र, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत त्यांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला.
“जे पक्ष सोडून गेले आहेत, ते पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करतील. ते पाया पडतील, विनवण्या करतील; पण त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका. रोज उद्घाटने करणारे अनेक नेते घरी गेल्यावर दार बंद करून रडतात. ते साहेबांचं नाव घेतात, पण उघडपणे बोलत नाहीत,” असे म्हणत त्यांनी बंडखोरांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.
‘शिवसैनिकांचा जुना दरारा पुन्हा हवा’
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेची ताकद आणि दरारा पुन्हा निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगताना चंदनशिवे भावनिक झाले. “अजित पवार गेले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शपथ घेतली. हा विनोद नाही, तर वेदना आहे. आज सामान्य माणसासाठी फोन करणारे कमी झाले आहेत. अन्यायग्रस्ताला पाणी पाजून त्याचं काम करणारी माणसं हवीत. मुंबईत शिवसैनिकांचा तोच आवाज आणि तोच दरारा पुन्हा दिसला पाहिजे,” असे ते म्हणाले.
गायकवाडांवरही निशाणा
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करताना चंदनशिवे यांनी त्यांच्यावरही टीका केली. “पुतळ्यांच्या उंचीवर प्रेम करणारे लोक आज महाराजांना विसरत आहेत. पुतळा पडला की रडतात. पण महाराजांचे विचार जपण्याची तयारी नाही. कुणाला शिव्या देऊन लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे गायकवाडांना फटकारले.
आदित्य ठाकरेंना मैदानात उतरण्याचे आवाहन
भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट आवाहन केले. “गावागावात, शहरांच्या चौकात, झोपडपट्ट्यांमध्ये एक हुरहूर आहे. लोक नव्या ठाकरेची वाट पाहत आहेत. ही पोकळी भरून काढण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. शिवसैनिकांसोबत भीमसैनिकही तुमच्या पाठीशी उभा राहील. हा भगवा वारकऱ्यांचा आहे, बाळासाहेबांनी दिलेला आहे. संविधान आणि तिरंग्याला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर आमचा काळा रंगही या भगव्यात मिसळेल,” असे ते म्हणाले.
‘कांबळे’ कवितेतून राजकीय टोला
भाषणाचा शेवट करताना चंदनशिवे यांनी आपल्या प्रसिद्ध ‘कांबळे’ कवितेचा उल्लेख करत राजकीय टोलेबाजी केली. शिक्षण, सामाजिक अन्याय आणि सत्तेच्या दबावाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “कांबळे कधीच रडला नाही, फक्त कण्हला. आजही शिवसैनिकांवर कितीही दबाव आला, चौकशा झाल्या, तरी तो झुकणार नाही. जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही.”
चंदनशिवे यांच्या भाषणातील उपरोध, राजकीय टीका आणि भावनिक आवाहनांमुळे संपूर्ण सभागृह वारंवार दणाणून गेले. त्यांच्या भाषणाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विशेष रंग भरल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली.


