मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आमचं अर्ध आयुष्य काँग्रेसविरोधात लढण्यात गेलं. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसाठी अनेक वार सोसले, संकटांमध्ये साथ दिली. मात्र काँग्रेसने कधीही मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाही. शब्दाला जागली. पण आज भाजपच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
पक्षातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. “आज जी गद्दारी झाली आहे, त्याबद्दल मी त्या-त्या मतदारसंघातील जनतेची जाहीर माफी मागतो. मोदी लाट असतानाही मतदारांनी बाळासाहेब आणि माझ्यावर विश्वास ठेवून या लोकांना निवडून दिलं होतं. पण त्यांनी त्या विश्वासाचा विश्वासघात केला,” असे ते म्हणाले.
“कुटुंबावर हल्ले झाले तेव्हा कुठे होता?”
आदित्य ठाकरे यांच्याबाबत करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. “आदित्य फिरायला पाहिजे, असं सांगणारे जे आहेत, त्यांनी आधी हे सांगावं की आमच्या कुटुंबावर जेव्हा हल्ले झाले, आरोप झाले, तेव्हा यांच्यापैकी एक तरी छातीची ढाल बनून आमच्या समोर उभा राहिला होता का? आमच्यावर झालेले वार झेलले होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मी भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आलास?”
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “मी जर लोकांना भेटत नव्हतो, तर गद्या, तू निवडून कसा आलास? लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मी सहा ते दहा सभा घेतल्या होत्या. तेव्हा हे सगळे निवडून आले. पण मी कधी गर्वाने सांगितलं नाही की मी तुला तिकीट दिलं, निवडून आणलं, मंत्री केलं. कारण तो माझा स्वभाव नाही.”
ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेला किंमत नाही म्हणाल, पण बाळासाहेब ठाकरे यांना तरी किंमत द्या. त्यांच्याच नावावर तुम्ही मतं मागितली आणि आज त्यांच्याच विचारांशी बेईमानी करत आहात.”
भाजपवर गंभीर आरोप
केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना ठाकरे यांनी निवडणूक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका महिलेला पराभूत करण्यासाठी बंगालमध्ये सव्वा-दोन लाख सुरक्षा दल तैनात करता, पण मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तेच दल का वापरत नाही? निवडणुका जिंकण्यासाठी देशाची यंत्रणा वापरणं योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
पुढे त्यांनी भाजपला आव्हान देत म्हटले, “पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसायचं असेल तर उद्याच घुसा. शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देईल. पण देशभक्तीच्या नावाखाली फक्त राजकारण करू नका.”
“हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व”
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर निशाणा साधला. “जे आज आम्हाला विरोध करत आहेत, त्यांनी यापूर्वी शिवसेनाप्रमुखांनाही विरोध केला होता. माझ्या आजोबांनाही विरोध करणाऱ्या त्याच प्रवृत्ती आज पुन्हा डोकं वर काढत आहेत. हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा आणि महाराष्ट्र धर्माचा भगवा हा एकच आहे. जो भगव्यात भेद करतो, तो खरा हिंदू असूच शकत नाही,” असेही ठाकरे म्हणाले.
बंडखोरीनंतर संघर्ष तीव्र
लोकसभेत ठाकरे गटाचे सहा खासदार वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. पक्षातील बंडखोरीनंतर प्रथमच त्यांनी इतक्या कठोर शब्दांत फुटीर खासदारांवर हल्ला चढवत भाजपवरही थेट निशाणा साधला. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


