मुंबई प्रतिनिधी
देशभरात रविवारी (२१ जून) होणाऱ्या नीट-यूजी (NEET-UG) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लाखो विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी रविवारी नियोजित असलेला मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असून सर्व उपनगरीय लोकल सेवा नियमित वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कसारा, कर्जत आणि इतर उपनगरी भागांतील हजारो विद्यार्थी नीट परीक्षेसाठी रेल्वेवर अवलंबून असतात. मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवेत होणारा विलंब, फेऱ्यांचे रद्द होणे किंवा पर्यायी वाहतुकीची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर एकूण १,८२० लोकल फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. याशिवाय कोणत्याही मार्गावर दुरुस्ती अथवा अभियांत्रिकी कामांसाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि इतर प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, नीट-यूजी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर आणि कथित पेपरफुटी प्रकरणामुळे गेल्या महिन्यात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मार्फत २१ जून रोजी पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रांवर पोहोचण्यासाठी प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
एनटीएने विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भातील कोणत्याही अफवा, दिशाभूल करणारे संदेश किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच ग्राह्य धरावी, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
परीक्षेच्या दिवशी प्रवास सुरळीत राहावा यासाठी रेल्वे प्रशासन, वाहतूक विभाग आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


