नागपूर प्रतिनिधी
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत पुन्हा एकदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी घेतलेला २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवत विदर्भातील सर्व शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने यापूर्वी विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच २२ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाची शिक्षण विभागावर ताशेरे
याचिकेवरील सुनावणीदरम्यान नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या आदेशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पूर्वीच्या न्यायालयीन निर्देशांचा विचार न करता २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल उपस्थित केला.
न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि हवामानाचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. विदर्भात अद्यापही उष्णतेची तीव्रता कायम असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.
सरकारची एकसमान वेळापत्रकाची भूमिका फेटाळली
सुनावणीदरम्यान राज्य सरकारने राज्यभरातील शाळा एकाच वेळापत्रकानुसार सुरू करण्याची भूमिका मांडली. मात्र त्यावर न्यायालयाने, “जर संपूर्ण राज्यात एकसमानता आणायची असेल तर मग १५ जून किंवा १ जुलै ही तारीख का निवडली नाही?” असा सवाल करत सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.
न्यायालयाने असेही नमूद केले की, राज्यातील विविध भागांतील हवामानाची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे अधिक योग्य ठरते.
२० हजार शाळांतील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
अखेर नागपूर खंडपीठाने शिक्षण संचालकांनी जारी केलेली दोन्ही आदेशपत्रे रद्द करत विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाचा परिणाम विदर्भातील सुमारे २० हजार शाळांवर होणार असून लाखो विद्यार्थ्यांना अतिरिक्त आठ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
पालक संघटनांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
राज्यातील इतर भागांमध्ये पूर्वनियोजित वेळापत्रक कायम
दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू होणार आहेत. मात्र विदर्भातील विद्यार्थ्यांना उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत अतिरिक्त सुट्टीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भात इतर भागांच्या तुलनेत उशिरा होणार असून शाळा प्रशासनालाही त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले असून, आगामी काळात हवामानाचा विचार करून शैक्षणिक वेळापत्रक ठरविण्याबाबत नवे धोरण आखले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

