नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील दीक्षाभूमीच्या बौद्ध स्तूपावर भगवा झेंडा दर्शविणारे पोस्टर आणि पत्रके प्रसिद्ध करून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह सात जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. संबंधित पोस्टरमुळे आंबेडकरी आणि बहुजन समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी सिव्हिल लाइन्स येथील पत्रकार क्लबमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काही पोस्टर आणि पत्रके प्रदर्शित करण्यात आली होती. या पोस्टरमध्ये दीक्षाभूमीच्या स्तूपावर भगवा झेंडा दर्शविण्यात आल्याचे निदर्शनास आले.
तक्रारीनुसार, दीक्षाभूमीच्या स्तूपावर परंपरेनुसार पंचशील ध्वज असतो. मात्र संबंधित पोस्टरमध्ये त्याऐवजी भगवा झेंडा दाखवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ही पोस्टर्स युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश फेसबुक पृष्ठावरही प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात शिवराज मोरे यांच्यासह अजय चिकारा, अनुराग भोयर, मिथिलेश कान्हेरे, तनवीर विद्रोही आणि इतर काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीनंतर तक्रारीतील आरोपांच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत आहेत.


