उमेश गायगवळे
देशभरात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरीस सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून रस्ते ओस पडू लागतात आणि दुपारी तर शहरांपासून खेड्यांपर्यंत जीवन थबकल्यासारखे वाटते. हवामान खात्याकडून वारंवार उष्णतेच्या लाटांचे इशारे दिले जात आहेत. टीव्ही स्क्रीनवर “घरातून बाहेर पडू नका”, “पाणी भरपूर प्या”, “दुपारी प्रवास टाळा” अशा सूचना झळकत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, काही भागांत शाळा आठवड्यातून तीन दिवस सुरू ठेवण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
सामान्य माणूस या जळत्या उन्हात घराबाहेर पडायलाही धजावत नाही. बांधकाम मजूर दुपारची कामे थांबवत आहेत. शेतकरी झाडाखाली आसरा घेत आहेत. शहरांमध्ये दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. अशा भयावह उष्णतेत एक वर्ग मात्र न थांबता गावागावात फिरत आहे. डोक्यावर टोपी, खांद्यावर बॅग, हातात मोबाईल आणि कागदपत्रे घेऊन घराघरांत माहिती गोळा करणारे हे लोक म्हणजे आपल्या राज्यातील शिक्षक आणि शासकीय कर्मचारी. देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जनगणनेच्या कामासाठी हे कर्मचारी अक्षरशः उन्हाशी दोन हात करत आहेत.
आज या शिक्षकांकडे पाहिले, की खऱ्या अर्थाने “सरकारी कर्मचारी” या शब्दाला प्रतिष्ठा देणारे चेहरे कोणते, याची जाणीव होते. कारण शासकीय यंत्रणेबद्दल सामान्य माणसाच्या मनात अनेकदा नकारात्मक भावना निर्माण झालेल्या दिसतात. भ्रष्टाचार, कमिशन, टक्केवारी, कामातील दिरंगाई या गोष्टींबद्दल सातत्याने चर्चा होत असते. काही प्रमाणात त्यात तथ्यही असू शकते. मात्र त्याच यंत्रणेत काही कर्मचारी असे आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. आज जनगणनेच्या कामासाठी गावोगावी फिरणारे शिक्षक हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण ठरत आहेत.
जनगणना हे फक्त माहिती गोळा करण्याचे काम नाही. ती देशाच्या भविष्यातील धोरणांची पायाभरणी असते. शासनाच्या योजना, निधीचे वाटप, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा या सर्व गोष्टींची दिशा जनगणनेच्या आकडेवारीवर ठरत असते. त्यामुळे हे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. आणि ही जबाबदारी शासनाने ज्यांच्या खांद्यावर टाकली आहे, ते म्हणजे शिक्षक.
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमानात हे शिक्षक घराघरांत जाऊन माहिती संकलित करत आहेत. डिहायड्रेशनचा धोका, उष्माघाताचा धोका, अंगातून वाहणारा घाम, भाजून निघणारे रस्ते आणि त्यात मोबाईलवरील फीडिंगची धावपळ… हे सर्व सहन करत ते काम करत आहेत. काही शिक्षक तर विनोदाने सांगतात, “आमच्या शरीरात आता रक्तापेक्षा जास्त ओआरएस आणि सरकारी आदेश वाहत असावेत!” पण या विनोदामागे एक वेदना दडलेली आहे.
सकाळी घरातून बाहेर पडताना त्यांच्या मनात एकच विचार असतो – “आज ठरवलेली घरे पूर्ण करायचीच!” सूर्य डोक्यावर तळपत असतो, पण त्यांचा निर्धार त्याहून तापलेला असतो. अनेक शिक्षकांना दिवसाला किलोमीटरच्या किलोमीटर पायी फिरावे लागते. दुर्गम भाग, डोंगरदऱ्या, आदिवासी वाड्या-पाडे येथे पोहोचणे म्हणजे एक मोठे आव्हान असते. अनेक ठिकाणी रस्तेच नाहीत. वाहनांची सुविधा नाही. उन्हातान्हात चढ-उतार करत चालताना पाय थरथर कापू लागतात. अंगातील शक्ती संपत जाते. पण काम मात्र थांबत नाही.
ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती अधिक कठीण आहे. शहरांतील अनेक कार्यालये आता वातानुकूलित झाली आहेत. थंडगार एसीमध्ये बसून फाईल्स हलवल्या जातात. पण ग्रामीण शिक्षकांना मात्र थेट सूर्याच्या दाहक झळांमध्ये उतरावे लागते. अंगावर भाजणारे ऊन, डोक्यावर आगीसारखे तापलेले आकाश आणि पायाखाली जळणारी जमीन… या सगळ्यात ते माहिती गोळा करत फिरत आहेत.
प्रत्यक्ष काम करताना त्यांना केवळ उन्हाचाच सामना करावा लागत नाही, तर मानसिक आणि सामाजिक त्रासही सहन करावा लागतो. अनेक वेळा घरे कुलूपबंद आढळतात. मग त्याच भागात पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात. एखाद्या गावात सकाळी गेले, तर लोक शेतात गेलेले असतात. संध्याकाळी पुन्हा जावे लागते. एका घरासाठी दोन-दोन, तीन-तीन वेळा फिरावे लागते. त्यामुळे शारीरिक थकवा वाढतोच, पण मानसिक ताणही प्रचंड वाढतो.
काही ठिकाणी कुत्रे अंगावर धावून येतात. अपरिचित व्यक्ती पाहून गावातील कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज शिक्षकांच्या मागे लागतो. तरीही हातातील कागदपत्रे सावरत, स्वतःचा तोल सांभाळत ते काम करत राहतात. अनेक महिला शिक्षिकांना तर अधिक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. निर्जन भाग, दुपारचे ऊन, लांबचा प्रवास आणि त्यात सामाजिक असुरक्षिततेची भावना… पण त्या देखील खंबीरपणे काम करत आहेत.
या सगळ्यापेक्षाही वेदनादायक गोष्ट म्हणजे अनेक नागरिकांकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक. अनेकांना जनगणनेचे महत्त्वच समजत नाही. शिक्षक दारात गेले, की काही लोक त्यांना एखादा सेल्समन समजतात. काही जण दारच उघडत नाहीत. काहीजण “आम्हाला वेळ नाही”, “काही माहिती देणार नाही” असे सरळ सांगतात. वृद्ध नागरिकांपैकी काहीजण तर संतापाने बोलतात – “फक्त माहिती घेऊन जातात, आम्हाला काहीच मिळत नाही!” काहीजण शासनावरील राग या शिक्षकांवर काढतात.
वास्तविक पाहता, हे शिक्षक फक्त शासनाचे आदेश पाळत असतात. त्यांचा त्या योजनांशी किंवा निर्णयांशी थेट संबंध नसतो. पण तरीही लोकांचा राग, नाराजी, चिडचिड त्यांनाच सहन करावी लागते. काही लोक साधे पाणीही विचारत नाहीत. दुपारच्या जळत्या उन्हात घामाने भिजलेला शिक्षक दारात उभा असतो, पण अनेकांना त्याची दया येत नाही. अशा प्रतिकूल वातावरणातही शिक्षक हसतमुखाने माहिती घेत राहतात. कारण त्यांना माहित असते की, ते केवळ नोकरी करत नाहीत, तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत.
खरे तर जनगणना हे युद्धपातळीवरील काम असते. एका ठरावीक कालावधीत लाखो घरांपर्यंत पोहोचून अचूक माहिती गोळा करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी संयम, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद लागते. आणि ही ताकद आज शिक्षक दाखवत आहेत. त्यामुळेच त्यांना “उन्हातील सुपरहिरो” म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
आज समाजाने आणि शासनाने या शिक्षकांच्या त्यागाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण या कामात अनेक कर्मचारी आजारी पडत आहेत. डिहायड्रेशन, रक्तदाब, उष्माघात अशा समस्या वाढत आहेत. काही वेळा जीवितहानीचाही धोका असतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना आवश्यक आहेत. त्यांना योग्य मानधन मिळाले पाहिजे. उन्हाळ्यातील अशा धोकादायक कामासाठी विशेष भत्ता दिला पाहिजे. पिण्याचे पाणी, ओआरएस, वैद्यकीय सुविधा आणि वाहतुकीची मदत उपलब्ध करून दिली पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर्तव्य बजावताना एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर शासनाने केवळ सांत्वन करून थांबता कामा नये. त्यांच्या कुटुंबाला भरघोस आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेतले पाहिजे. कारण देशासाठी काम करताना प्राण गमावणारा कर्मचारी हा खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवक असतो.
आज अनेकदा शिक्षकांवर टीका केली जाते. “शिक्षक काम करत नाहीत”, “फक्त सुट्ट्या उपभोगतात” असे आरोप सहजपणे केले जातात. पण जनगणनेच्या या कामाने त्या सर्व आरोपांना जोरदार उत्तर दिले आहे. शिक्षक फक्त वर्गात उभा राहून धडा शिकवत नाही, तर शासनाने दिलेली प्रत्येक जबाबदारी तो प्रामाणिकपणे पार पाडतो, हे या कामातून दिसून आले आहे.
कोविड काळातही शिक्षकांनी मोठी भूमिका बजावली होती. गावोगावी जाऊन जनजागृती करणे, लसीकरण मोहिमेत मदत करणे, क्वारंटाईनची माहिती ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. आता पुन्हा एकदा या रणरणत्या उन्हात ते रस्त्यावर उतरले आहेत. फरक एवढाच, की त्या वेळी चेहऱ्यावर मास्क होता आणि आता डोक्यावर उन्हाची जळती तलवार आहे.
या शिक्षकांच्या डोळ्यांत थकवा आहे, अंगात वेदना आहेत, पण मनात अभिमानही आहे. “भारत सरकारने आमच्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली,” असे ते अभिमानाने सांगतात. कारण त्यांना माहित आहे की, ते देशाच्या प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या हातून गोळा होणारी माहिती उद्याच्या भारताचे चित्र ठरवणार आहे.
समाजानेही आता या कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जनगणनेसाठी आलेल्या शिक्षकांशी आदराने वागले पाहिजे. त्यांना योग्य माहिती दिली पाहिजे. शक्य असेल तर पाण्याचा एक ग्लास दिला पाहिजे. कारण ते आपल्यासाठीच काम करत असतात. त्यांच्या कामामुळेच शासनाला वास्तव समजते आणि योजनांची आखणी करता येते.
आज जेव्हा एखादा शिक्षक दुपारच्या रणरणत्या उन्हात घामाने निथळत आपल्या दारात उभा राहतो, तेव्हा तो फक्त माहिती मागायला आलेला कर्मचारी नसतो; तो देशाच्या भविष्यासाठी डेटा गोळा करणारा एक शांत सैनिक असतो. त्याच्या हातात बंदूक नसते, पण जबाबदारी असते. त्याच्या अंगावर गणवेश नसतो, पण राष्ट्रसेवेची जाणीव असते. आणि म्हणूनच या शिक्षकांचा संघर्ष हा केवळ सरकारी कामाचा भाग नसून, तो कर्तव्यनिष्ठेचा जिवंत आदर्श आहे.
या जळत्या उन्हात जनगणनेचे काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला आणि कर्मचाऱ्याला समाजाने मनापासून सलाम करायला हवा. कारण ते केवळ आकडे गोळा करत नाहीत, तर देशाच्या भविष्यासाठी पाया रचत आहेत. त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा राष्ट्रसेवेचा साक्षीदार आहे.


