मुंबई प्रतिनिधी
नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सुरू केलेल्या आंदोलनाला विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके करत असून, देशभरातून आलेल्या युवकांच्या मोठ्या सहभागामुळे या आंदोलनाकडे राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आहे.
जंतरमंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले असून, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी भूमिका आयोजकांनी स्पष्ट केली आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनीही उपस्थित राहून समर्थन दिले.
विद्यार्थ्यांच्या वेदना सरकारने ऐकाव्यात : उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना केंद्र सरकारवर टीका केली. “देशाचे भवितव्य मानल्या जाणाऱ्या हजारो तरुणांना उन्हात रस्त्यावर उतरून आपल्या वेदना व्यक्त कराव्या लागत आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून, सरकारला त्यांच्या मागण्या ऐकाव्याच लागतील,” असे ठाकरे यांनी म्हटले.
त्यांनी पुढे सांगितले की, या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या मनातील संताप आणि असंतोष व्यक्त होत असून, त्याकडे दुर्लक्ष करणे सरकारला परवडणारे नाही.
लोकशाहीसाठी महत्त्वाचे पाऊल : आदित्य ठाकरे
शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनाचे समर्थन केले. “नीट आणि सीबीएसई परीक्षांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नाही. नागरिकांनी लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याच्या प्रक्रियेत हे महत्त्वाचे पाऊल आहे,” असे ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांकडून मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांचे कौतुक केले.
तरुणांच्या संतापाची अभिव्यक्ती : अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनाला देशातील युवकांच्या असंतोषाची अभिव्यक्ती असे संबोधले. “देशातील लाखो विद्यार्थी आणि तरुण आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने त्यांची दखल घ्यावी. आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरविण्याऐवजी त्यांच्या समस्या सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे केजरीवाल म्हणाले.
त्यांनी पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना तात्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणीही केली.
युवकांमधील असंतोषाचे प्रतीक : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाला युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले. “नीट आणि सीबीएसई परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्याशिवाय केंद्र सरकारच्या विविध धोरणांबद्दलही युवकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ एका मागणीपुरते मर्यादित नसून व्यापक असंतोषाचे प्रतीक बनले आहे,” असे ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
दिल्ली पोलिसांच्या भूमिकेचे प्रियंका चतुर्वेदींकडून कौतुक
शिवसेना (उबाठा)च्या माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी
यांनी आंदोलनासाठी परवानगी दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे कौतुक केले. “लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सीजेपीला आंदोलनाची परवानगी देण्याचा निर्णय योग्य असून, दिल्ली पोलिसांनी यावेळी योग्य भूमिका घेतली,” असे त्यांनी म्हटले.
आंदोलनाकडे देशाचे लक्ष
जंतरमंतरवरील या आंदोलनात देशभरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे. नीट आणि सीबीएसई परीक्षांशी संबंधित मुद्द्यांवरून सुरू झालेले हे आंदोलन आता युवकांच्या व्यापक प्रश्नांशी जोडले जात असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अद्याप या आंदोलनाविषयी अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.


