मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोने तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भाजपशी संबंधित एका पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक केली. या कारवाईत ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजित आचरेकर यांचा समावेश असून ते भाजपच्या कामगार संघटनेत चिटणीस म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान आणि फलिल मोहम्मद कासिम यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
डीआरआयने पहाटे अडीचच्या सुमारास विमानतळ परिसरात ही कारवाई केली. संशयास्पद हालचालींच्या आधारे अधिकाऱ्यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला.
सूत्रांच्या माहितीनुसार अजित आचरेकर यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे कामगार संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. तसेच या तस्करीसाठी परदेशातील कोणत्या व्यक्ती किंवा टोळ्यांचे नेटवर्क वापरण्यात आले होते का याचाही शोध घेतला जात आहे.
या प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची, परदेश दौऱ्यांची आणि संपर्कांची माहिती तपास यंत्रणा गोळा करत आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत डीआरआयकडून अद्याप अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपींवरील आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.


