मुंबई प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. युवासेना सचिव तथा आमदार वरुन सरदेसाई यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या सोहळ्याला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, विभागप्रमुख तथा आमदार ॲड. अनिल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, स्पर्धेच्या युगात केवळ गुण मिळवणेच नव्हे, तर सामाजिक भान, नाविन्यपूर्ण विचार आणि नेतृत्वगुण विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून भविष्यात विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार अनिल परब यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या पालक आणि शिक्षकांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांच्या यशामागे कुटुंबाचे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाची भूमिका बजावत असते. आजचा हा सन्मान त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजक आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही केवळ परंपरा नसून, शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची सामाजिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा उपयोग समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सोहळ्यात दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमानामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, मेहनत आणि चिकाटीचा गौरव करण्यात आला असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करताना त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


