मुंबई प्रतिनिधी
राज्यातील एसटी बसस्थानकांवरील शौचालयांचा वापर प्रवाशांसाठी विनामूल्य करण्याच्या घोषणेनंतरही अनेक ठिकाणी शुल्क आकारले जात असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) अखेर याबाबत स्पष्ट परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना बसस्थानकांवरील शौचालयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालये प्रवाशांसाठी मोफत करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुंबईतील कुर्ला, दादर, मुंबई सेंट्रल, चेंबूर आदी बसस्थानकांवर अद्याप शुल्क आकारले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने दखल घेत ही सूचना जारी केली.
एसटीच्या नियोजन व पणन विभागाचे उपमहाव्यवस्थापक जयेश बामाने यांनी काढलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालये एसटी प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाकडून शौचालय वापरासाठी शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बसस्थानके, स्वच्छतागृहे, फिरती स्वच्छतागृहे तसेच चालक-वाहक विश्रांतीगृहांच्या स्वच्छता व देखभालीसाठी १ जून २०२६ पासून पुढील तीन वर्षांसाठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. आणि मुंबईतील क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तथापि, परिपत्रकानंतरही एखाद्या बसस्थानकावर शुल्क आकारले गेल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.
एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर शौचालये मोफत करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली. अंमलबजावणीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.


