मुंबई प्रतिनिधी
मुंबईत उबर कॅब चालकांच्या गैरवर्तणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवघ्या 40 रुपयांच्या टोल शुल्काच्या वादातून एका 21 वर्षीय महिला डिजिटल क्रिएटरला मारहाण केल्याचा आरोप उबर चालकावर करण्यात आला आहे. प्रवासाचे संपूर्ण भाडे ऑनलाइन भरूनही अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्याने चालकाने महिलेचा हात पिरगळला, कानशिलात लगावली आणि पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर संबंधित चालकाविरोधात पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू झाली असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महालक्ष्मी ते नेरुळ प्रवासादरम्यान घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी नावाच्या 21 वर्षीय डिजिटल क्रिएटरने 22 एप्रिल रोजी महालक्ष्मी येथून नेरुळपर्यंत जाण्यासाठी उबर कॅब बुक केली होती. सुरुवातीला या प्रवासाचे भाडे सुमारे 460 रुपये दाखविण्यात आले होते. मात्र, प्रवास संपेपर्यंत ते वाढून 501 रुपये झाले. नेरुळ येथे पोहोचल्यानंतर तिने ॲपद्वारे संपूर्ण रक्कम ऑनलाइन भरली.
याचवेळी चालकाने टोल शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त 40 रुपये रोख स्वरूपात देण्याची मागणी केली. मात्र, टोल शुल्क भाड्यामध्ये आधीच समाविष्ट असल्याचे सांगत महिलेने अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिला. यानंतर चालक संतापल्याचे सांगितले जाते.
गाडीतून उतरू दिले नाही; हात पिरगळल्याचा आरोप
महिलेच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्यानंतर चालकाने तिला काही काळ गाडीतून उतरू दिले नाही. त्यानंतर ती गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना चालक अधिक आक्रमक झाला. परिस्थिती चिघळत गेल्यानंतर तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी चालकाला दूर ढकलले. त्यावर चालकाने तिच्या कानशिलात मारल्याचा तसेच तिचा हात पकडून जोरात पिरगळल्याचा आरोप तिने केला आहे.
या घटनेमुळे ती घाबरली असून तिला शारीरिक वेदनाही झाल्याचे तिने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
‘पुन्हा मारून दाखवू का?’; धमकीचाही आरोप
घटनेनंतर सोशल मीडियावर अनुभव कथन करताना शिवानीने धक्कादायक दावा केला आहे. “हा केवळ वाद नव्हता. चालकाने मला कानशिलात मारली, माझा हात पिरगळला आणि मला दुखापत झाली. त्यानंतर तो मला ‘मी तुला पुन्हा मारून दाखवू का?’ अशी धमकी देत होता,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महिलेच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अनेकांनी उबर प्रशासन आणि पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांकडून अजामीनपात्र गुन्हा दाखल
सोशल मीडियावर प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत संबंधित चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत जाणूनबुजून दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने मारहाण करणे आणि हेतुपुरस्सर अपमान करणे यांसारख्या कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे. या कलमांअंतर्गत आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत
मुंबईसारख्या महानगरात ॲप-आधारित टॅक्सी सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, चालकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाच्या घटना वारंवार समोर येत असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षिततेची हमी देण्याचे आव्हान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसमोर उभे राहिले आहे.
या घटनेमुळे उबरच्या सुरक्षा यंत्रणांवर आणि चालकांच्या पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


