मुंबई प्रतिनिधी
खार (पूर्व) येथील जय हिंद नगर परिसरातील सर्व्हिस रोडवर उभारण्यात आलेल्या सुमारे १०० ते १२५ फूट उंचीच्या अनधिकृत होर्डिंगमुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवितास आणि सुरक्षेस गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार समोर आली आहे. याबाबत महानगरपालिकेच्या एच पूर्व संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कादरी टिंबर मार्ट, पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील झोपडपट्टी परिसरात हे भलेमोठे होर्डिंग उभारण्यात आले आहे. निवासी परिसर, रस्त्यालगत तसेच घरांच्या अगदी जवळ अशा प्रकारचे मोठे होर्डिंग उभारण्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई असतानाही संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीतील नागरिक वास्तव्यास असून संबंधित होर्डिंग सर्व्हिस रोडलगत उभारण्यात आले आहे. यापूर्वीही हेच होर्डिंग काही वर्षांपूर्वी कोसळले होते मात्र त्यावेळेस जीवित हानी झाली नव्हती मात्र पावसाळ्यात उंच होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ अनधिकृत होर्डिंग हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अँड रोशनी सोनी यांनी मुंबई महापालिकेच्या एच पुर्व विभागाला लेखी निवेदन दिले आहे मात्र एक महिना उलटून गेला तरी सदर होर्डिंगवर कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाणार का, पावसाळा तोंडावर असताना झोपडपट्टी परिसरात उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


