पुणे प्रतिनिधी
उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने काहीसा दिलासा दिला; मात्र या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने शहरासह जिल्ह्यात मोठी तारांबळ उडवली. पुणे शहर, आळंदी, आंबेगाव, खेड, भोर आणि महाळुंगे परिसरात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, झाडे कोसळली, वीजपुरवठा खंडित झाला, तर ग्रामीण भागात भाजीपाला आणि उन्हाळी पिकांना मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील विविध भागांत दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला. काळे ढग दाटून आल्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही वेळातच पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक सखल भागांत वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला.
आळंदीत झाडे कोसळून वाहतूक ठप्प
आळंदी शहरालाही वादळी पावसाचा मोठा फटका बसला. विशेषतः पद्मावती रस्त्यावरील जगन्नाथ पार्क परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक जुनी व मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली. ही झाडे थेट रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने त्यावेळी वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासन, आपत्कालीन पथक आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेली झाडे आणि फांद्या हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले. काही झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने खबरदारी म्हणून परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला.
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीतील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. काही घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तासांत अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आंबेगाव तालुक्यात भाजीपाल्याला मोठा फटका
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, जवळे, भराडी, जारकरवाडी, मेंगडेवाडी आणि पारगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. सकाळपासून जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि साडेचारच्या सुमारास वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य पूजा थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरची आणि पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काही भागांत वीजपुरवठाही विस्कळीत झाला होता. उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतीपिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खेड तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
खेड तालुक्यात शुक्रवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसामुळे उन्हाळी बाजरी, भुईमूग, मका आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी वातावरणात अचानक बदल झाला आणि काही क्षणांतच काळे ढग दाटून आले. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. अनेक शेतकऱ्यांनी हा पाऊस धोक्याची घंटा असल्याचे सांगत प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी केली आहे.
भोरमध्ये पुलावर गुडघाभर पाणी
भोर तालुक्यातील नीरा नदीवरील संस्थानकालीन राणी लक्ष्मीबाई पुलावर मुसळधार पावसानंतर गुडघाभर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात या पुलावर अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
पाण्यातून जीव मुठीत धरून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढावा लागत होता. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर प्रशासनाने काही काळ नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली. पुलावरील पाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महाळुंगे परिसरात मुसळधार पावसाची ‘बॅटिंग’
खेड तालुक्यातील औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाळुंगे परिसरातही मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटांतच रस्ते, चौक आणि औद्योगिक कंपन्यांसमोरील परिसर जलमय झाला.
चाकण-महाळुंगे मार्गावर पाण्याचे मोठे लोंढे वाहू लागल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले. अनेकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो कामगारांची या पावसामुळे मोठी गैरसोय झाली. रेनकोट किंवा छत्री नसलेले दुचाकीस्वार पूर्णपणे भिजून गेले. अनेकांनी दुकानांचे ओटे, शेड्स आणि झाडांचा आसरा घेत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
महाळुंगे परिसरातील बाजारपेठ, औद्योगिक भाग आणि अंतर्गत रस्त्यांवर निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. उन्हाच्या कडाक्यानंतर या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी अचानक कोसळलेल्या या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
पुढील काही तास सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील काही तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच सखल भागांत पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


