• ७३ कोटींच्या कथित अपहारप्रकरणी एसआयटीची कारवाई
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि वाढीव मोबदला वाटपातील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी अविनाश पाठक यांना विशेष तपास पथकाने (SIT) अटक केली आहे. दिवसभर चौकशी केल्यानंतर एसआयटीने बुधवारी रात्री लातूर येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राज्यभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय आहे भूसंपादन घोटाळा?
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वाढीव मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. जमिनींचे मूल्यांकन कृत्रिमरीत्या वाढवून देणे, बनावट आदेश तयार करणे आणि मागील तारखांचा वापर करून मोबदला मंजूर करणे, अशा प्रकारांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासानुसार, राष्ट्रीय महामार्ग अधिनियमानुसार संपादित जमिनींसाठी वाढीव मोबदला मिळावा यासाठी संबंधित खातेदारांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे अर्ज केले होते. मात्र २२ एप्रिल २०२५ रोजी त्यांची बदली झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील मागील तारखांवर आदेश काढण्यात आल्याचे उघड झाले. या आदेशांवर पाठक यांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्याचा संशय आहे.
या बनावट आदेशांच्या आधारे तब्बल १५४ प्रकरणांमध्ये २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला. त्यापैकी सुमारे ७३ कोटी ४ लाख रुपये संबंधित खातेदारांना वितरितही करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या आदेशांबाबत कोणतीही अधिकृत नोंद, रजिस्टर अथवा दस्तऐवजीकरण भूसंपादन समन्वय कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
एसआयटीकडून दिवसभर चौकशी
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू असून आर्थिक व्यवहार, दस्तऐवज, आदेश प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा बारकाईने तपास केला जात आहे. बुधवारी एसआयटीने अविनाश पाठक यांची अनेक तास चौकशी केली. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या घोटाळ्यात आणखी काही अधिकारी, कर्मचारी तसेच दलालांच्या भूमिकेचाही तपास सुरू असल्याने पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत अविनाश पाठक?
अविनाश पाठक हे २०१३ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत होते. त्यांनी बीड जिल्ह्यात विविध महत्त्वाच्या पदांवर दीर्घकाळ काम केले आहे. उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.
त्यानंतर ते बीडचे जिल्हाधिकारी झाले. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळावरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले होते. जवळपास १५ वर्षे बीडमध्ये विविध पदांवर कार्यरत राहिल्यानंतर गेल्या वर्षी त्यांची लातूर येथे बदली करण्यात आली होती.
राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, बनावट आदेश नेमके कोणी तयार केले आणि निधी वाटपाची प्रक्रिया कशी पार पडली, याबाबत आता एसआयटीचा तपास निर्णायक ठरणार आहे.


