सोलापूर प्रतिनिधी
स्वतःला ‘बाळू मामांचा अवतार’ म्हणून सादर करत भक्तांची दिशाभूल करणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांखाली कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. भोसलेविरोधात यापूर्वीही सोलापूर आणि पुणे ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भोसले याने स्वतःला धार्मिक शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करत अनेकांना विविध पूजाअर्चांच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचे आमिष दाखवले. विशेषतः कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्याचे खोटे आश्वासन देत आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारीही त्याच्याविरोधात दाखल झाल्या आहेत.
कुर्डुवाडी येथील एका तक्रारदाराने व्यवसायात भरभराट होण्यासाठी विशेष पूजा करण्याचा सल्ला देत भोसलेने दोन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीकडून ५० हजार रुपये घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात भोसले आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने भोसले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. “आरोपीविरोधात आधीपासूनच बलात्कार, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीसंबंधी चार गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असून आणखी कोणी पीडित असल्यास त्यांनी पुढे यावे,” असे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, भोसलेचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून या प्रकरणाला वेगळेच राजकीय परिमाण मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही अन्य नेत्यांसोबतचे त्याचे फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक व संगमनेरमधील तत्सम घटनांनंतर सोलापूर जिल्ह्यातही भोंदूगिरीचे प्रकरण समोर आल्याने अंधश्रद्धेविरोधातील उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्याचे संकेत दिले असून भोसलेविरोधातील आरोपांची साखळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


