सोलापूर प्रतिनिधी
माढा तालुक्यातील उपळाई हद्दीत अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना ढाबा मालकाने व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उशिरा घडली. या हल्ल्यात दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल-फ्री क्रमांकावरून संबंधित ढाब्यावर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक अमित नागरे आणि अंमलदार युवराज टिळे हे कारवाईसाठी येडेश्वरी ढाब्यावर गेले होते. मात्र, कारवाईदरम्यान ढाबा मालकाशी त्यांचा वाद झाला. ‘राज्यात इतर ठिकाणीही मद्यविक्री सुरू असताना आमच्याच ढाब्यावर का कारवाई?’ असा सवाल करत त्याने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे समजते.
वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. ढाबा मालकाने आणि त्याच्या साथीदारांनी प्लास्टिकच्या पाईपने अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या मारहाणीत उपनिरीक्षक नागरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अंमलदार टिळे यांनाही मार लागला आहे. घटनेदरम्यान एक अंमलदार मोबाईलवर व्हिडिओ चित्रण करत असताना हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचेही समोर आले आहे.
जखमी अधिकाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवायांना अशा प्रकारे विरोध होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


