मुंबई प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना दर्जेदार, अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे उभारण्यात आलेल्या श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या (एसव्हीकेएम) १२०० खाटांच्या भव्य मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण शनिवारी, २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी राहणार असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पणनमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे तसेच एसव्हीकेएमचे अध्यक्ष अमरीशभाई पटेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी तपनभाई मुकुशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसह आयुर्वेदिक रुग्णालय, अलका देसाई स्कूल ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटर, एसव्हीकेएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कृषी महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालय यांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
सीमावर्ती भागासाठी ‘आरोग्य हब’
शिरपूर येथे उभारण्यात आलेले हे १२०० खाटांचे रुग्णालय उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदूर आणि गुजरातच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरणार आहे. आतापर्यंत उपचारासाठी मुंबई किंवा दिल्लीसारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागत असलेल्या रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे रुग्णालय मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. “सर्वांना समान उपचार” हे ब्रीदवाक्य ठेवत कॅशलेस उपचार सुविधेवरही भर देण्यात आला आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि प्रचंड मनुष्यबळ
या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची सांगड घालण्यात आली आहे.
• १२०० खाटांची एकूण क्षमता
• १५० हून अधिक आयसीयू खाटा
• २८ एनआयसीयू व २० पीआयसीयू खाटा
• १७ मेजर व ९ मायनर ऑपरेशन थिएटर
आधुनिक ड्रेगर मॉड्युलर प्रणाली व अत्याधुनिक अॅनेस्थेसिया सुविधा
रुग्णसेवेसाठी सुमारे १५० डॉक्टर, १५० नर्सेस आणि मोठ्या प्रमाणावर सहाय्यक कर्मचारी असे एकूण ३१०० जणांचे मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे.
सरकारी योजनांशी संलग्नता
या रुग्णालयात विविध सरकारी आरोग्य योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
• महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना
• प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
• ईएसआयसी, सीजीएचएस, ईसीएचएस
• राष्ट्रीय डायलिसिस योजना
यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही उच्च दर्जाची उपचारसेवा सुलभ होणार आहे.
सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा
रुग्णालयात जनरल मेडिसीनपासून ते कर्करोग, हृदयविकार, न्यूरोसायन्सेस, किडनी विकार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, स्त्रीरोग, बालरोग, मानसोपचार, त्वचारोग, प्लास्टिक सर्जरी अशा सर्व प्रमुख विभागांची सुविधा उपलब्ध आहे.
तसेच सीटी स्कॅन, एमआरआय, पॅथॉलॉजी, ब्लड बँक, आपत्कालीन सेवा, फिजिओथेरपी आणि पॅलिएटिव्ह केअर यांसारख्या पूरक सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळ
शिरपूरमधील हे रुग्णालय केवळ उपचार केंद्र न राहता संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षणासाठीही महत्त्वाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण व सीमावर्ती भागातील आरोग्य व्यवस्थेला बळ देत हे प्रकल्प आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.


