मुंबई प्रतिनिधी
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बाँस मराठी’ च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी रंगतदार वातावरणात पार पडला. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात आणि उत्कंठावर्धक शेवटानंतर तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत राकेश बापट याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या पर्वात सुरुवातीपासूनच ठाम आणि संतुलित खेळ करत तन्वीने प्रेक्षकांची मनं जिंकली. रणनीती, टास्कमधील सातत्यपूर्ण कामगिरी आणि घरातील नातेसंबंध सांभाळत तिने अंतिम फेरीत आघाडी घेतली. प्रेक्षकांच्या मतदानात तिला सर्वाधिक मतं मिळाल्याने तिच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
विजेतेपदासह तन्वीला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी, १५ लाख रुपयांचा धनादेश, ई-स्कूटर तसेच पि. एन. गाडगिळ ॲड सन्स, कडून १० लाख रुपयांचे गिफ्ट व्हाउचर प्रदान करण्यात आले. या बक्षिसांमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अंतिम फेरीत दीपाली सय्यद, अनुश्री माने, विशाल कोटियाल, राकेश बापट आणि तन्वी कोलते असे पाच स्पर्धक होते. प्रेक्षकांच्या मतदानानंतर विशाल कोटियाल तिसऱ्या स्थानी बाद झाला, तर अनुश्री माने चौथ्या स्थानी स्पर्धेबाहेर पडली.
या पर्वात ‘काटा’ आणि ‘टोळी’ असे दोन गट विशेष चर्चेत राहिले. अंतिम चार स्पर्धकांमध्ये ‘काटा’ गटाचे तन्वी कोलते व राकेश बापट, तर ‘टोळी’ गटाचे अनुश्री माने व विशाल कोटियाल होते. मात्र शेवटच्या टप्प्यात ‘काटा’ गटाने सरशी साधत विजेतेपद पटकावले.
यंदाचा सीझन प्रेक्षकांच्या सहभागामुळे विशेष गाजला. टास्कमधील स्पर्धात्मकता, गटबाजी आणि भावनिक चढ-उतार यांमुळे या पर्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तन्वी कोलतेच्या विजयाने या पर्वाची सांगता होत असताना, तिच्या पुढील कारकिर्दीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


