नवी दिल्ली वृत्तसंस्था
संसदेच्या राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. देशातील चार महत्त्वाच्या राज्यांतून निवडून आलेल्या एकूण १९ सदस्यांनी सभागृहात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधले. प्रकृती अस्वास्थ्याची पर्वा न करता त्यांनी व्हीलचेअरवरून सभागृहात प्रवेश करत राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांच्या या जिद्दीचे आणि सार्वजनिक जीवनातील सातत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संसद भवन, दिल्ली येथे आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. pic.twitter.com/CJzC9ZjYnM
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 6, 2026
या शपथविधी सोहळ्यात देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी.राधाकृष्णण यांनी पवार यांच्यासह १९ सदस्यांना शपथ दिली. यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरीवंश नारायण सिंग तसेच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री कीरण रिजूजू यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
लोकसभा आणि राज्यसभा मिळून पवार यांनी आतापर्यंत नवव्यांदा संसद सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांनी सार्वजनिक जीवनातील सक्रियता कायम ठेवत राज्यसभेचे सदस्य म्हणून पुन्हा एकदा संसदीय कारकीर्दीला प्रारंभ केला. व्हीलचेअरवरून त्यांनी सभागृहात प्रवेश करत शपथ घेतल्याचा क्षण उपस्थित सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
पवार यांच्या प्रकृतीमुळे त्यांना उमेदवारी अर्ज स्वतः जाऊन दाखल करता आला नव्हता. तरीही त्यांनी शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी लावून सार्वजनिक जीवनातील आपली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या दृढ इच्छाशक्तीचे अनेक सदस्यांनी कौतुक केले.
पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीची तब्बल ५९ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी आता ६०व्या वर्षात पदार्पण केले आहे. भारतीय संसदीय इतिहासात इतक्या दीर्घकाळ सक्रिय राहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
ज्योती वाघमारे यांनी वेधले लक्ष
या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्योती वाघमारे यांनीही खासदार म्हणून शपथ घेतली. चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या वाघमारे यांनी स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधले. कपाळावर आडवे कुंकू, नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर अशा पारंपरिक पेहरावात त्या सभागृहात आल्या होत्या.
हातात भारतीय संविधानाची प्रत धरून त्यांनी शपथ घेतली. शपथविधीवेळी त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यास नियमांनुसार मनाई असल्याने सभापती सी. पी. राधाकृष्णण यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर नियमांनुसार त्यांना पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रातून निवडून आलेल्या इतर सदस्यांमध्ये रामदास आठवले आणि माया इनव्हते यांचाही समावेश होता. राज्यसभेतील या शपथविधी सोहळ्यात विविध राज्यांतील नव्या सदस्यांच्या उपस्थितीने संसदीय कार्याला नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.


