नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायमूर्ती बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायासनासमोर ही सुनावणी पार पडली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
विशेष तपास पथकाकडून (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, खरातविरोधात नव्या तक्रारीही दाखल होत असल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे तपासासाठी कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.
अवघ्या काही मिनिटांत निर्णय
न्यायालयातील सुनावणी अत्यंत जलदगतीने पार पडली. न्यायालयाने कागदपत्रांची पाहणी करून अवघ्या काही मिनिटांत निर्णय देत खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दरम्यान कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात उपस्थित राहून प्रकरणाशी संबंधित प्राथमिक माहिती सादर केली.
समोरासमोर बसवून चौकशी
तपासादरम्यान काही महत्त्वाच्या व्यक्तींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत एका पुजाऱ्यासह लेखापाल आणि सराफ व्यावसायिकाचाही समावेश होता. या तपासातून मौल्यवान खडे, रत्न आणि सोन्याच्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत.
याशिवाय, बँक कर्ज व्यवहारांमध्येही संशयास्पद हालचाली झाल्याची माहिती समोर आली आहे. काही अधिकाऱ्यांना मोठ्या रकमेची देणगी किंवा व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. सोने खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून मोठ्या प्रमाणात नफा कमावल्याचेही तपासात उघड होत असल्याचे सांगितले जाते.
महिलेच्या तक्रारीतून उघड झाले प्रकरण
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमधून झाली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अशोक खरातला अटक केली.
खरात हा सिन्नर तालुक्यातील एका मंदिर ट्रस्टशी संबंधित असून तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जात होता. अनेक प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे सल्ल्यासाठी येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
तपास अधिक गंभीर टप्प्यात
दरम्यान, खरातवर लागलेल्या गंभीर आरोपांमुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहार, मंदिर ट्रस्टशी संबंधित घडामोडी आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध या सर्व बाबींचा तपास सध्या सुरू आहे. दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
तपास यंत्रणेकडून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


