नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात याच्या अडचणी आता अधिकच वाढल्या असून, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधातही पहिल्यांदाच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिर्डी परिसरातील एका पीडित व्यक्तीची तब्बल चार एकर जमीन फसवणुकीने बळकावल्याचा आरोप या दाम्पत्यावर करण्यात आला असून, या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात अशोक खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीर सावकारकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात किरण नानासाहेब सोनवणे (रा. निमगाव, ता. राहाता) आणि अरविंद पांडुरंग बावके (रा. साकुरी, ता. राहाता) यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींमध्ये अशोककुमार खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि अशोक परभत तांबे यांचाही समावेश आहे.
दोन टक्के व्याजाने बेकायदेशीर सावकारकी
पोलिसांच्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात जमीन व्यवहाराच्या नावाखाली बेकायदेशीर सावकारकी सुरू होती. पैशांची गरज असलेल्या पीडित व्यक्तीला दरमहा दोन टक्के व्याजाने मोठी रक्कम देण्यात आली. या व्यवहारात एकूण 2 कोटी 52 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
मात्र या रकमेपैकी 1 कोटी 64 लाख रुपये विविध मध्यस्थांच्या माध्यमातून व्याजाच्या नावाखाली पुन्हा वसूल करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा व्यवहार प्रत्यक्षात सावकारकीचा सापळा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
व्याज भरूनही जमीन परत नाही
पीडित व्यक्तीने घेतलेली रक्कम आणि व्याजाची मोठी रक्कम परत केल्यानंतरही आरोपींकडून व्यवहाराचा हिशोब स्पष्ट करण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. इतकेच नव्हे तर गहाण ठेवलेली चार एकर जमीन परत देण्यासही नकार देण्यात आला.
पीडिताने उर्वरित व्यवहार पूर्ण करण्याची तयारी दर्शवली असतानाही आरोपींनी जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कोरे धनादेश ताब्यात घेऊन गैरवापर
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, विश्वास संपादन करून पीडित व्यक्तीकडून स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश घेण्यात आले होते. हे धनादेश एका आरोपीकडे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या धनादेशांचा गैरवापर करून खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचा प्रकार पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाला आहे.
भोंदूगिरीनंतर आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे
अशोक खरात याच्या कथित भोंदूगिरीचा भंडाफोडही शिर्डी पोलिसांनीच काही काळापूर्वी केला होता. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता जमीन व्यवहार आणि बेकायदेशीर सावकारकीचा हा नवा धागा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(2), 318(2), 318(4) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 39 व 44 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


