मुंबई प्रतिनिधी
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हे प्रकरण केवळ महिलांच्या लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून त्याचे स्वरूप अधिक व्यापक असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणाचा ‘लॉजिकल एंड’ गाठायचा असेल, तर सर्व संबंधित पैलूंची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात अजून अनेक व्यक्ती आणि संस्थांची चौकशी होणे बाकी आहे. विशेषतः शिवनिका ट्रस्ट, काही ब्लॉगर तसेच नामकरण आवारे यांच्याबाबत अद्याप तपासाची दिशा स्पष्ट झालेली नाही. तसेच चाकणकर यांच्याबाबतही कोणतीही चौकशी झालेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. काही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती थेट मुख्यमंत्री यांच्या समोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “या प्रकरणातील काही बाबी सार्वजनिकपणे मांडणे योग्य नाही. त्यामुळे त्या थेट मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतच मांडणार आहे,” असे अंधारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात काही माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधींचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे त्या अनुषंगानेही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, खरात यांच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी तसेच ‘व्यंकटेश’ कंपनीतील व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणीही अंधारे यांनी केली.
या प्रकरणात नाव समोर येत असलेल्या अधिकारी भांडे यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी करतानाच सृष्टी खरात यांच्याबाबतही चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, या प्रकरणाचा तपास व्यापक पातळीवर होऊन सर्व संबंधित बाबी समोर येणे आवश्यक असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी (१ एप्रिल) त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायासनासमोर ही सुनावणी झाली.
खरात याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असून चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले जात आहे.
खरात विरोधात सातत्याने नवनव्या तक्रारी दाखल होत असून, महिलांचे कथित लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक तसेच इतर अनेक गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली होती.
दरम्यान, अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात यापूर्वीही तीन वेळा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


