मुंबई प्रतिनिधी
महिलांचे शोषण करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या कृत्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष उषाताई रामलू यांनी केले.
यावेळी आंदोलकांनी भोंदूगिरीच्या आडून महिलांचे शोषण करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. समाजात अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांची फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा चाप बसला पाहिजे, तसेच पीडित महिलांना तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका नेत्यांनी यावेळी स्पष्ट केली.
रिपब्लिकन पक्ष समाजातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अंधश्रद्धेविरोधातील लढ्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. अशा भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाई झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
या आंदोलनात महिला नेत्या संगीता कापुरे, जिल्हाध्यक्ष अमोल तांबे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नाली जाधव, रेश्मा खान, सोना कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात अशोक खरात याच्यावर कठोर गुन्हे दाखल करून त्याला कडक शिक्षा देण्याची तसेच पीडित महिलांना त्वरित न्याय देण्याची मागणी करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचा हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


