मुंबई प्रतिनिधी
मुंबई : प्रभादेवी येथील उड्डाणपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेल्या घरांबाबत काही रहिवाशांनी आक्षेप नोंदवल्याने १२ रहिवाशांना घरे बदलून देण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी दर्शवली आहे.
प्रभादेवी पूल तोडून त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून या प्रकल्पामुळे हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित झाल्या आहेत. या इमारतींतील एकूण ८३ रहिवाशांना कुर्ला येथे कायमस्वरूपी घरे देण्याचे नियोजन होते. मात्र, जवळच्या परिसरातच घरे मिळावीत, अशी रहिवाशांची मागणी होती.
यानंतर परिसरातच घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून उपलब्ध झालेली अतिरिक्त घरे बाधितांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एमएमआरडीएने म्हाडाला सुमारे १०० कोटी रुपये दिले.
दरम्यान, अँटॉप हिल, दादर पूर्व आणि भायखळा येथील घरांचा परिसर योग्य नसल्याचे कारण देत काही रहिवाशांनी घरे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित १२ रहिवाशांना घरे बदलून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत एमएमआरडीएने म्हाडाला पत्र दिले आहे. म्हाडानेही घरे बदलून देण्याची तयारी दर्शवली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


