मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणावर अखेर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून “पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. मुंबईत एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सच्या शुभारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अजून किती खालच्या पातळीवर आपण उतरणार आहोत? जादूटोणा विरोधी कायदा आपल्या राज्यात आहे; मात्र कायद्याचे पालन करणारेच जर अशा लोकांच्या नादी लागत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.” महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे विषय असताना लिंबू-टाचण्यांसारख्या गोष्टी समोर येणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय टोला लगावत, “एपस्टीन फाईलमधून लक्ष विचलित करण्यासाठी विविध गोष्टी सुरू आहेत. अनेक फोटो आणि नावं समोर येत आहेत. ज्यांचं कर्तृत्व नाही, त्यांना असे मार्ग घ्यावे लागतात,” असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संबंधित भोंदूबाबाला पाणी देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या,” असे ते म्हणाले.
यासोबतच राज्यातील गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. “त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा झेंडा असला तरी कारवाई झाली पाहिजे,” असे स्पष्ट मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.


