नाशिक प्रतिनिधी
भविष्य सांगण्याच्या नावाखाली विवाहित महिलेवर तब्बल दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमधील कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला गुन्हे शाखेने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. ३५ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई करत आरोपीला कर्मयोगीनगर येथील बंगल्यातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खरात हा स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि ज्योतिषी असल्याचे सांगत अनेक राजकीय नेते, व्यावसायिक तसेच सेलिब्रिटींचे भविष्य सांगत असे. याच ओळखीचा वापर करून त्याने एका विवाहित महिलेवर मानसिक दबाव टाकत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
‘पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून अत्याचार
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, खरातने “तुझ्या पतीवर मोठे संकट आहे, त्यांचा मृत्यू होऊ शकतो” अशी भीती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने बराच काळ हा प्रकार सहन केला. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
अटकेसाठी पोलिसांचा ‘डमी प्लॅन’
खरातचे अनेक प्रभावशाली लोकांशी संबंध असल्याने त्याला अटक होण्याची माहिती मिळू नये, यासाठी गुन्हे शाखेने विशेष रणनीती आखली. संबंधित परिसरात चोर शिरल्याची अफवा पसरवण्यात आली. चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरात झडती सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या निमित्ताने पोलिसांनी खरातच्या बंगल्यातही तपासणी केली. घरात तो उपस्थित असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
फार्महाऊसवर छापा; पिस्तूल आणि काडतुसे जप्त
अटकेनंतर पोलिसांनी आरोपीच्या फार्महाऊसवरही छापा टाकला. या कारवाईत त्याने जमा केलेल्या मालमत्तेची विविध कागदपत्रे पोलिसांना सापडली. तसेच एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
सात दिवसांची पोलीस कोठडी
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशोक खरातने याच पद्धतीने आणखी कुणाला फसवले किंवा अत्याचार केले का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून कथित ज्योतिषांच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक आणि अत्याचाराच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


