सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस भरती प्रक्रियेला आता अंतिम टप्पा गाठला असून रविवारी (ता. १५) लेखी परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सकाळी ८ वाजताच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा मात्र सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असली तरी सुरक्षा तपासणी व अन्य प्रक्रिया लक्षात घेता उमेदवारांनी वेळेआधीच हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सोलापूर शहर पोलिस दलातील ७३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण ८८६ उमेदवार पात्र ठरले असून त्यांची परीक्षा अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९० पदांसाठी १,०४४ उमेदवार लेखी परीक्षा देणार असून त्यांचे परीक्षा केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील अभियांत्रिकी महाविद्यालयात निश्चित करण्यात आले आहे.
राज्यभरातील पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा याच दिवशी विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याने उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा
या लेखी परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाचे असणार आहेत. परीक्षा दीड तासांची असणार असून उमेदवारांची ज्ञानपातळी, सामान्य ज्ञान व बौद्धिक क्षमता यांची चाचणी घेतली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य
परीक्षेला येताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे अनिवार्यपणे सोबत आणावीत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
• परीक्षा हॉल तिकीट
• मैदानी चाचणीदरम्यान देण्यात आलेले ओळखपत्र
• दोन पासपोर्ट साईज फोटो
परीक्षेसाठी आवश्यक असलेले पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षा केंद्रावरूनच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बंदी घातलेल्या वस्तूंवर कडक नजर
परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. उमेदवारांना खालील वस्तू परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
• मोबाईल फोन
• डिजिटल डायरी
• मायक्रोफोन किंवा मायक्रो कॅमेरा
• स्मार्ट वॉच
• स्मार्ट आय-ग्लासेस
• पेन, पेन्सिल, खोडरबर इत्यादी स्वतःची लेखनसामग्री
परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी सर्व उमेदवारांची सखोल अंगझडती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संशयास्पद साहित्य आढळल्यास उमेदवाराला परीक्षेत बसू दिले जाणार नाही.
उशिरा येणाऱ्यांना प्रवेश नाही
परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असली तरी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई
परीक्षेदरम्यान कॉपी करणे किंवा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करताना उमेदवार आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षेची संधी
या भरती प्रक्रियेत ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादीतून प्रत्येक पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले. मात्र अनेक उमेदवारांना समान गुण मिळाल्याने अतिरिक्त १५६ उमेदवारांनाही लेखी परीक्षेची संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे ७३ पदांसाठी तब्बल ८८६ उमेदवारांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असून पोलिस दलात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांची अंतिम कसोटी रविवारी होणार आहे.


