मुंबई प्रतिनिधी
मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्ये सुरक्षित प्रवासाबाबत वारंवार जनजागृती केली जात असतानाही निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका कायम आहे. पश्चिम मार्गावरील जवळ धावत्या लोकलमधून दोन तरुण रुळावर कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
पश्चिम रेल्वे मार्गावरून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये संबंधित तरुण दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करत होते. गाडीने वेग घेतल्यानंतर स्थानकापूर्वी काही अंतरावर एकाचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यानंतर दुसराही रुळावर कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर प्रवाशांनी आरडाओरडा करत तातडीने सिग्नल दिल्याने मदतकार्य सुरू करण्यात आले.
(जीआरपी) आणि रेल्वे संरक्षण दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात दोघांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले असून नशेत दरवाजाला धरून उभे असताना त्यांचा हात सटकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात दोघांनाही डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींना तातडीने नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप दोघांची ओळख पटलेली नाही. त्यांच्या जवळील वस्तूंच्या आधारे नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ पश्चिम मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा दरवाजात उभे राहून किंवा लटकून प्रवास न करण्याचे, तसेच मद्यधुंद अवस्थेत प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केवळ कायद्याने दंडनीय नसून जीवावर बेतू शकते, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.


