अकोला प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याच्या सलग घटनांमुळे व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अकोटच्या मध्यवर्ती बाजारपेठेत एका किरकोळ व्यावसायिकाला अज्ञात महिलेने बनावट नोटा देऊन फसविल्याची घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात बनावट चलनाचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी नरसिंग मार्ग परिसरातील चपल दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकाकडे तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या महिलेने ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांद्वारे व्यवहार केला. गर्दीच्या वेळी झालेल्या या व्यवहारानंतर दुसऱ्या दिवशी नोटा मोजताना त्या बनावट असल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आले. संबंधित महिलेची ओळख पटलेली नसून, या प्रकाराची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
अकोटमध्ये यापूर्वीही २० जुलै २०२५ रोजी श्रीराम सुपर शॉपी येथे अशाच पद्धतीने ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक झाल्याची घटना घडली होती. त्या वेळीही महिला ग्राहकाने गर्दीचा फायदा घेत दुकानदाराला बनावट नोटा दिल्याचे उघड झाले होते. सलग घटनांमुळे बनावट नोटांचे जाळे अकोटमार्गे अकोला जिल्ह्यात पसरत असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात रंगू लागली आहे.
स्थानिक व्यावसायिकांच्या मते, बाजारपेठेतील लहान दुकाने, फेरीवाले आणि दैनंदिन रोखी व्यवहार करणारे घटक हे अशा बनावट नोटांच्या फसवणुकीचे सोपे लक्ष्य ठरत आहेत. हुबेहूब दिसणाऱ्या १००, ५० आणि ५०० रुपयांच्या नोटा विशेषतः महिलांकडून चलनात पसरवल्या जात असल्याचे काही घटनांमधून पुढे आले आहे. परिणामी किरकोळ व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून रॅकेट उघड करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने अद्याप अधिकृतरीत्या रॅकेटच्या अस्तित्वाबाबत कोणतीही पुष्टी केलेली नसली तरी सलग घटनांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये सतर्कता वाढविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संशयास्पद नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अकोटमधील या घटनांनी अकोला जिल्ह्यात बनावट चलनाच्या वाढत्या धोक्याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली असून, किरकोळ व्यवहारांमध्ये नोटांची पडताळणी करण्याबाबत जनजागृतीची आवश्यकता पुढे आली आहे.


