प्रतिनिधी रणजीत मस्के
अकोला जिल्ह्यातील कौलखेड व खडकी परिसरात घडलेल्या मारहाण व जीवघेण्या हल्ल्याच्या तीन गंभीर घटनांप्रकरणी पोलिसांनी झटपट कारवाई करत अवघ्या ८ तासांत सर्व आरोपींना अटक केली. बार्शीटाकळी तालुक्यातील जंगल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ही कारवाई केली असून गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस स्टेशन खदान हद्दीत ४ एप्रिल रोजी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीपीओ पथक, खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त टीम तपासासाठी नियुक्त करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी अटक टाळण्यासाठी खडकी शेत शिवार, ता. बार्शीटाकळी (जि. अकोला) येथील जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने सापळा रचून ५ एप्रिल रोजी सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कबीर सुनील बलखंडे (१८), धनंजय संदीप ढाले (१९), शिवम उर्फ शुभम संजय शेळके (१९), गौरव सुनील चव्हाण (२०) यांचा समावेश असून एक विधी संघर्षग्रस्त बालकही ताब्यात घेण्यात आला आहे. काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
अल्पवयीन आरोपीच्या बाबतीत ‘जुवेनाइल जस्टिस अॅक्ट’नुसार न्यायालयात प्रौढ म्हणून खटला चालवण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संबंधित बालकांच्या पालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


