मुंबई प्रतिनिधी
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उच्चस्तरीय कार्यक्रमांसाठी दक्षिण मुंबईत मंगळवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करून पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. नागरिकांनी नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेटवे ऑफ इंडिया परिसरात ‘इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन’ या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन होणार असून, ताज महाल पॅलेस येथे ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम’ पार पडणार आहे. या कार्यक्रमांच्या अनुषंगाने परिसरातील मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेशबंदी ठेवण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोलनाका या दरम्यान सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी राहणार असून, अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग
श्यामप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ते गेटवे ऑफ इंडिया-अॅडम स्ट्रीट-पी. रामचंदानी मार्ग-जोकिम अल्वा चौक (नॉर्थ कोर्ट) या दरम्यान सर्वसामान्य वाहनांना प्रवेशबंदी असेल.
पर्यायी मार्ग : रिगल जंक्शन-शहीद भगतसिंग मार्ग-महाकवी भूषण मार्ग-बी. के. बोमण बेहराम मार्ग.
किंवा रिगल जंक्शन-एस.बी.एस. रोड-इलेक्ट्रिक हाउस जंक्शन-बेस्ट मार्ग-अल्वा चौक-पी. रामचंदानी मार्ग-रेडिओ क्लब.
पी. रामचंदानी मार्ग
जोकिम अल्वा चौक ते अॅडम स्ट्रीट या दिशेने वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग : रेडिओ क्लब-पी. रामचंदानी मार्ग-अल्वा चौक-बेस्ट मार्ग.
या भागातील बसथांबे व टॅक्सी स्टँड तात्पुरते बंद राहतील.
याशिवाय नाथालाल पारेख मार्ग, जगन्नाथ भोसले मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगांवकर मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग व बी. के. बोमण बेहराम मार्ग (ताज हॉटेलमागील भाग ते हॉटेल डिप्लोमॅट) या मार्गांवर टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू राहतील, असे वाहतूक पोलिसांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


